भुसावळातील नाहाटा महाविद्यालयातील प्रा.ई.जी.नेहेते यांचे पेंशन रोखावे : केदारनाथ सानप यांची मागणी
भुसावळ (3 डिसेंबर 2024) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयातील प्रा.एकनाथ जी. यांचे वेतन व पेंशन केस थांबवावी, अशी मागणी भुसावळातील माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी 8 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव यांच्याकडे केली आहे. तक्रार अर्जाची दखल घेत शिक्षण सह संचालक यांनी कुलसचिव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांना सानप यांनी केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने अर्जात नमुद केल्यानुसार आपला स्वयंस्पष्ट अभिप्रायासह खुलासा दोन दिवसात या कार्यालयात सादर करण्याचे 13 रोजी डॉ.कपिल सिंघेल यांनी कळवले आहे.
असे आहे नेमके प्रकरण
केदार सानप यांच्या अर्जात नमुद केले आहे की, भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयातील प्रा. ई.जी. नेहेते यांनी मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे वेळापत्रकानुसार नेमून दिलेल्या तासिका घेतल्या नाहीत शिवाय अभ्यासक्रम पूर्ण न करता आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे. सानप यांनी महाविद्यालयाकडून प्रा.एकनाथ जी. नेहेते यांनी घेतलेल्या तासिकांचा तपशील माहितीच्या अधिकारात मागितला असता महाविद्यालयाने तो देण्यास नकार दिला. शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव यांच्याकडे याबाबत अर्ज केल्यानंतर प्रा.एकनाथ जी.नेहेते यांच्या विरोधात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे परीक्षेत केलेल्या गैरवर्तणुकीबाबत चौकशी सुरू आहे.

दोन वर्षांचे वेतन वसुल करण्याची मागणी
एखाद्या व्यक्तीची विभागीय किंवा विद्यापीठीय चौकशी सुरू असताना त्यांची पेन्शन केस थांबविली जाते, असा महाराष्ट्र शासन नागरी संहितेत नियम आहे. या नियमाचा आधार घेत नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकाची पेन्शन केस थांबविण्यात यावी व शिक्षण क्षेत्रास काळीमा फासणार्या प्राध्यापकांना वेळीच थांबविता यावे यासाठी मागील दोन वर्षांचे वेतन यांच्याकडून वसूल करावे, असे तक्रार अर्जात नमुद आहे. योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी केली आहे. या तक्रार अर्जाची दखल घेत शिक्षण सह संचालकांनी कुलसचिव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांना आपला स्वयंस्पष्ट अभिप्रायासह खुलासा दोन दिवसात या कार्यालयात सादर करण्यात यावा, असे आदेश डॉ.कपिल सिंघेल यांनी दिले आहेत. दरम्यान, नेहेते यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.




