मारकडवाडीत पोलिसांच्या ईशार्‍यानंतर बॅलेट पेपरवर निवडणूक रद्द


Ballot paper election cancelled after police warning in Markadwadi सोलापूर (3 डिसेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर शंका घेत मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया घेण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली मात्र प्रशासनाने मागणी फेटाळल्यानंतरही ग्रामस्थ मतदानावर ठाम होते. मंगळवारी बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी एक जरी मतदान झालं तर साहित्य जप्त करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा देता निवडून आलेले आमदार उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांची चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.

न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही : आमदार जानकर
प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदान होऊच द्यायचं नाही, साहित्य घेऊन जायचं यामुळे मतदान थांबवण्यात आलं आहे. येणार्‍या 8-10 दिवसांत आम्ही प्रांत कार्यालय किंवा जिथे न्याय मागण्याचं ठिकाण असेल तिथे ताकदीने 25 ते 30 हजार लोकांचा आक्रोश पोहचवण्याचं काम करू. यात न्याय मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही. असे आमदार उत्तमराव जानकर म्हणाले. ते म्हणाले की, आम्ही इथं मतदानाची प्रक्रिया पार पाडतोय, परंतु मतदान केल्यानंतर साहित्य जप्त होणार असेल, सगळे विस्कटलं जाणार असेल, त्यातून गोंधळ आणि झटापट होईल. किमान 1500 मतदान होईपर्यंत इथला निकाल येऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितले.


ईव्हीएमवर उपस्थित केली शंका
मारकडवाडीत जे मतदान होते त्यात 1400 मते मला आणि 502 मतदान समोरच्याला होणार होते. मी सगळा अभ्यास केला होता, मात्र समोरच्या उमेदवाराला 1003 मतदान दाखवण्यात आले आहे. ईव्हीएममुळे हे झाले आहे. या गावाचा आक्रोश होता, आम्ही दिलेले मत उत्तमराव जानकरांना न होता दुसर्‍याला कसं गेला हा प्रश्न गावकर्‍यांना होता. त्याची पडताळणी करण्यासाठी शासनाने सहकार्याची भूमिका घ्यायला हवी होती मात्र पोलिसांनी जमावबंदीचे आदेश काढले. ही निवडणूक घेता येणार नाही, असे आदेश काढले. एक मत टाकल्यावर साहित्य जप्त करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली मग न्याय मागायचा कसा ? असा सवाल आमदार उत्तमराव जानकर यांनी केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !