महायुतीचा मुख्यमंत्री उद्या ठरणार ! : आझाद मैदानावर शपथविधीची तयारी


The Chief Minister of the Mahayuti will be elected tomorrow!: Preparations for the oath-taking ceremony at Azad Maidan मुंबई (3 डिसेंबर 2024) : भाजप विधिमंडळ पक्षाच्या बुधवारी होणार्‍या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे.

उद्याच्या बैठकीत औपचारीक निवड
मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती असलीतरी विधी मंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची औपचारिक निवड झाल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी महायुतीतर्फे दावा केला जाईल. तत्पूर्वी भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी बुधवारी सकाळी 10 वाजता विधान भवनात बैठक होईल.

शपथविधी सोहळ्याची तयारी
आझाद मैदानावर 5 रोजी होणार्‍या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत उपस्थित असतील.

गृह खाते शिंदेंना देण्यास नकार
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, हा भाजपचा आग्रह असून त्यांना हवे असलेले गृह खाते देण्याची मात्र भाजपची तयारी नाही. मात्र अजित पवार यांना हवे असलेले अर्थ खाते, कृषी व काही महत्त्वाची खाती भाजपकडून दिली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी नमूद केले. फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला.

आज होणार खाते वाटपावर चर्चा?
मंगळवारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसून चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. अजित पवार हे सोमवारी खासगी कार्यक्रमासाठी नवी दिल्लीला गेले असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

आझाद मैदानात शपथविधीची तयारी
सोमवारी भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. मात्र शिवसेनेचे कोणीही नेते मैदानाकडे फिरकलेले नाहीत.

 


कॉपी करू नका.