‘स्ट्राईक रेटनुसार आम्ही दोन नंबरवर ; आम्हालाही शिंदेंच्या बरोबरीने मंत्री पद द्या : छगन भुजबळ


मुंबई (3 डिसेंबर 2024) : ‘स्ट्राईक रेटनुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. त्यामुळे आम्हालाही त्यांच्या (शिंदेंच्या) बरोबरीने मंत्रिपदे द्या, एवढीच आमची मागणी असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत. महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रिमदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत तर गृहमंत्री पद सोडण्यासं भाजपा तयार नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडूनही शिंदेंच्या बरोबरीने आम्हालाही मंत्रिपदे देण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?
ईव्हीएमबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी म्हटलं की, ईव्हीएममध्ये गडबड अशक्य आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः देखील सांगितलं होतं की ईव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही. आता मतदानात वाढ झाली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की, 6 वाजेपर्यंत गर्दी असते. मग गेट बंद केलं जातं आणि राहिलेल्या लोकांचं मतदान घेतलं जातं. त्यानंतर मतपेट्या बंद केल्या जातात. या गोष्टींना वेळ लागतो. शेवटच्या तासांत मोठ्या प्रमाणात मतदान होतं, असं छगन भुजबळांनी विरोधकांच्या आरोपावर उत्तर दिलं.


राष्ट्रवादीच्या मंत्री पदाबाबत काय म्हणाले?
मंत्री पदाबाबत मला देखील अनेक लोक वेगवेगळी नावं पाठवतात. मात्र, हे सर्व अंदाज आहेत. शेवटी ज्या दिवशी शपथविधी असतो, त्याच्या आधी एक दिवस पक्षाकडून सांगितलं जातं असतं. किंवा मंत्रिमंडळाची सर्व यादी राज्यपालांकडे जाते, तेव्हा ती यादी खरी असते. मात्र, तोपर्यंत हे सर्व अंदाज असतात, असं भुजबळांनी म्हटलं.

‘शिंदेंच्या बरोबरीने मंत्रिपदे द्या’
स्ट्राईक रेटनुसार आमच्यात दोन आणि तीन नंबरमध्ये थोडासा फरक आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आमचा देखील स्ट्राईक रेट चांगला आहे. मग तुम्ही आम्हाला (अजित पवारांच्या राष्ट्रवादीला) त्यांच्या (शिंदेंच्या शिवसेनेच्या) बरोबरीने मंत्रिपदे द्या, एवढी आमची मागणी आहे. यावर आता जे काय आहे ते सर्व नेते बसून निर्णय घेतील. कदाचित आम्हाला (शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) सारख्या जागा देतील किंवा एखादी जागा कमी जास्त होईल, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !