मालेगावातून चोरलेला 11 लाखांचा डंपर जळगावच्या एमआयसी भागात बेवारस आढळला
जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : संशयीताला शोधण्याचे आव्हान
जळगाव (16 डिसेंबर 2024) : मालेगाव तालुक्यातील लोणवाडे येथून 11 डिसेंबर रोजी डंपर लांबवण्यात आला होता. हा डंपर जळगावात आल्याची माहिती जळगाव एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर 11 लाख रुपये किंमतीचा डंपर जप्त करण्यात आला मात्र चोरट्यांचा शोध लागलेला नाही.
लोणवाडे येथून लांबवला डंपर
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील लोणवाडे येथून 11 डिसेंबर रोजी एक डंपर चोरी झाला होता. मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर याबाबतची माहिती सर्व पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी या डंपरचा शोध घेतला असता तो फातिमानगर येथे निर्जनस्थळी आढढळला. हा डंपर एमआयडीसी पोलिसांनी मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. यामुळे एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
मालेगावचा डंपर सापडला जळगावात
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलिस स्टेशन येथे डंपर चोरीचा गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील फिर्यादी ऋषिकेश महारू मोरे यांचा मालकीचा 11 लाख रुपये किमतीचा डंपर (क्रमांक एम.एच.15 डी.के.9753) हा लो.वाडे येथून 11 डिसेंबर रोजी चोरी गेला होता. गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना सदरचा डंपरचा शोध घेणे बाबत कळविले असता पोलिस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना डंपरचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शरद बागल यांनी कॉन्स्टेबल विशाल कोळी, राहुल रगडे यांच्यासह डंपरची सीसीटीव्ही कॅमेर्याच्या सहाय्याने पाहणी केली. यावेळी सदरील डंपर हा एमआयडीसी परिसरात गेल्याचे दिसून आल्याने सतत दोन दिवस संपूर्ण परिसरात मागोवा घेत असताना चोरीस गेलेला डंपर हा फातिमा नगर परिसरात निर्जनस्थळी उभा असल्याचे दिसून आला. डंपरचा पंचनामा करून मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.
यांनी लावला डंपरचा शोध
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, कॉन्स्टेबल विशाल कोळी, राहुल रगडे, नाईक योगेश बारी आदींच्या पथकाने केली.