जळगावातील 250 रिक्षा चालकांवर कारवाईचा ‘दंडुका’

अनपेक्षीत कारवाई रिक्षा चालक धास्तावले : यंत्रणेचे नियमांवर ‘बोट’


जळगाव (18 डिसेंबर 2024) : जळगाव शहरात बुधवारी शहर वाहतूक शाखा, आरटीओ प्रशासनाने धडक मोहीम राबवत 250 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली. एकाचवेळी अनपेक्षितपणे सुरू झालेल्या कारवाईनंतर नियम न पाळणार्‍या रिक्षा चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ व भीती पसरली. शहर वाहतूक शाखेने निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात एक लाख 61 हजार तर आरटीओ प्रशासनाने 31 हजार 500 रुपयांचा दंड वसुल केला.

पोलिसांचे नियमांवर बोट : जागीच दंड वसुली
जळगावचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघण करणार्‍या रिक्षा चालकांवर यंत्रणेकडून कारवाई करण्यात आली. बिल्ला व परमीट सोबत न ठेवणे, विना परवाना गॅस किट वापरणे, पीयूसी नसणे, इन्शुरन्स नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांवर कार शहरातील विविध भागात तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघण करणार्‍या रिक्षा चालकांना रिक्षा ताब्यात घेवून वाहतूक शाखेच्या कार्यालय आवारात जमा करण्यात आली व 250 वर रिक्षा चालकांना दंडाच्या पावत्या दिल्या जात होत्या.

पहिल्या दिवशी 250 वर रिक्षा चालकांवर कारवाई
पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत म्हणाले की, स्थानिक पोलीस प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून वाहतूक नियम न पाळणार्‍या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. पहिल्या दिवशी 250 वर रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दंड व कागदपत्रे नियमत असणार्‍या चालकांना वाहने परत देण्यात आली आहेत व अन्य रिक्षा चालकांना 31 डिसेंबरपर्यंत वाहनांची कागदपत्रे, बिल्ला, परमीट आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात आता नियमित कारवाई सुरूच राहील, असे गावीत यांनी सांगितले.


कॉपी करू नका.