खडक्यात सुशासन सप्ताहांतर्गत लोकशाही दिनात 11 तक्रारी प्राप्त

मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत घेतला आढावा


भुसावळ (25 डिसेंबर 2024) : प्रशासनिक सुधार आणि लोक तक्रार विभाग भारत सरकारमार्फत आयोजीत सुशासन सप्ताहात खडका महसुल मंडळात मंडळ स्तरावर लोकांच्या तक्रारी, विविध प्रश्न, समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात 11 नागरिकांनी लेखी तक्रारी केल्या. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, तहसीलदार निता लबडे, गटविकास अधिकारी डॉ.सचिन पानझडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले तसेच सर्व शासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते. लोकशाही दिनात एकूण 11 नागरीकांनी लेखी तक्रार केली. संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांना मंत्री संजय सावकारे यांनी सुचना देऊन सदरच्या तक्रारी तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या.

या तक्रारींचा समावेश
तक्रारीमध्ये प्रमुख्याने शेतकर्‍यांनी दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून उडणार्‍या राखेमुळे पिकांचे होत असलेले नुकसान, शिवरस्ता व पांदण रस्ते मोकळे करुन दुरुस्ती करुन मिळावे तसेच खडके गावाजवळील एक फॅक्टरीतून केमिकल जमिनीत सोडले जात असल्याने कारवाई करावी आदींसह विविध मागण्यांबाबत तक्रारी केल्या. कंपनीतील केमीकलचे पाणी जमिनीत सोडण्या प्रकरणी तहसीलदार लबडे यांनी जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत लोकशाही दिनात आदेश देण्यात आले. विविध विभागाच्या आलेल्या तक्रारी संबंधीत विभागाकडेस वर्ग करण्यात आल्या असून या तक्रारीचा निपटारा करुन तक्रारदारांना पत्रव्यवहाराने कळवले जाणार आहे. या तक्रारी तत्काळ मार्गी लावून तक्रारदारांना न्याय द्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.


कॉपी करू नका.