पुण्यातील सतीश वाघ खुनात मोठी अपडेट : पाच लाखांची सुपारी देणार्या पत्नीला बेड्या
पुणे (25 डिसेंबर 2024) : भाजपा विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मयताची पत्नी मोहिनी हिला अटक केली. आरोपींनी दिलेल्या कबुली जवाबानुसार पतीच्या हत्येसाठी पत्नीनेच पाच लाखांची सुपारी दिल्याचे त्यातून उघड झाले आहे.
अपहरण करीत झाली होती हत्या
सोमवार, 9 डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचे पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. सतीश वाघ पहाटे साडे सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर शेवरलेट एन्जॉय या कारमधून त्यांचे अपहरण केले. नंतर गाडी शिंदवणे घाटाच्या दिशेने नेण्यात आली. अपहरण केल्यानंतर चालत्या गाडीतच त्यांचा तीक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाणकरून व गळा दाबून खून करण्यात आला. थेट गाडी शिंदवणे घाटात नेली. नंतर तेथे एकाठिकाणी मृतदेह टाकून पुन्हा परत गाडी आली. मयताच्या शरीरावर तब्बल 72 वार करण्यात आले होते.
दरम्यान या खून प्रकरणात खून पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली होती. त्यामध्ये वाघ यांच्या घराजवळच राहणार्या एका आरोपीचाही समावेश आहे. सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आल्याचे निष्पन्नही झाले होते. याप्रकरणी एकूण पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सतीश वाघ यांच्या पत्नीचे नाव समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी मोहिनी सतीश वाघ यांच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर ती देखील या गटात सहभागी असलेल्या समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
सतीश वाघ हे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत. शेतकरी असलेल्या सतीश वाघ यांची हडपसर परिसरातील मांजरी भागात शेती आहे. याशिवाय हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. कुणाशीही भांडण नसणार्या सतीश वाघ यांचं असं अचानक अपहरण झाले होते. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पुणे शहरापासून 35 किलोमीटर अंतर असलेल्या शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह सापडला होता.