सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवत जळगावातील महिलेला 25 लाखांचा गंडा
Jalgaon woman duped of Rs 25 lakh by sending fake notices from CBI and Supreme Court जळगाव (27 डिसेंबर 2024) : सायबर ठगांकडून नाना क्लृप्त्या काढून नागरिकांना फसवणुकीचे प्रकार सुरू आहे. जळगावातील एका महिलेला आता अशाच एका नव्या पद्धत्तीने फसवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सायबर भामट्यांनी मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी करीत इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवत 25 लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
जळगावातील एका महिलेला प्रवीणकुमार, के.सी. सुब्रमन्यम, प्रदिप सांवत आणि संदिप राव असे नाव सांगणारे अनोळखी सायबर ठगांनी व्हाट्सअपवरुन व्हॉइस कॉल तसेच व्हिडिओ व नॉर्मल कॉल आणि मेसेज करुन बनावटी सुप्रिम कोर्ट नोटीस तसेच इंटरपोलच्या नावाची रेड नोटीस तसेच गोपनीयता कायम ठेवण्यासाठी सीबीआयच्या नावाची नोटीस, असे सगळे बनावटी कागदपत्र व्हाट्सअपद्वारे पाठवून महिलेला अटक करण्याची भीती दाखवली. जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेला सगळ्या केस मधून बाहेर पडण्याचे खोटे आश्वासन देत इन्सपेक्शन फीच्या नावाखाली 25 लाख रुपये एका बँक खात्यात टाकायला सांगितले. भेदरलेल्या महिलेने पैशांची व्यवस्था करून सांगितलेल्या खात्यात पैसे जमा केले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार जळगाव सायबर पोलिसांत प्रविणकुमार, के. सी. सुब्रमन्यम, प्रदिप सांवत आणि संदिप राव असे नाव सांगणार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहे.