आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून सातपुडा आदिवासी एक्सप्रेस सुरू
परसाडे लोकनियुक्त सरपंच मीना तडवींनी केले बस सेवेचे उद्घाटन

यावल (3 जानेवारी 2025) : चोपडा-यावल-रावेर या तीन तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी राहणार्या आदिवासी समाज बांधवांना कमी खर्चात आणि कमी वेळात सहज प्रवास करता यावा याकरीता आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातुन बुधवारी सातपुडा आदिवासी एक्सप्रेस या बस सेवेला सुरवात झाली. परसाडे बुद्रुक गावात लोकनियुक्त सरपंच यांच्याहस्ते या बससेवेचा शुभारंभ झाला. सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी तडवी समाज आहे. हा समाज रावेर-यावल व चोपडा तालुक्यात विखुरला गेला आहे. रावेरपासून ते थेट चोपड्यापर्यंत सातपुड्याच्या पायथ्याशी शहरी भागात न येता आदिवासी भागात एक रस्ता आहे. या रस्त्यावरून आदिवासी एक्सप्रेस ही बससेवा सुरू करण्यात यावी, अशी आदिवासी बांधवांची मागणी होती व ती आमदार अमोल जावळे यांनी पूर्ण केली आहे.
सरपंच व पदाधिकार्यांकडून स्वागत
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा परसाडे बुद्रुकच्या लोकनियुक्त सरपंच मीन राजू तडवी यांच्याहस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. बससेवा सुरू करण्याचे आदेश जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी दिले. यावल आगारात सकाळी नऊ वाजता भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, भाजपा जिल्हा वैद्यकीय आघाडीचे सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे, आगार प्रमुख डी.बी.महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपुडा आदिवासी एक्सप्रेस गाडीचे धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले.
प्रसंगी जळगाव विभागाचे वाहतूक निरिक्षक बाबू उर्फ संजू तडवी, स्थानक प्रमुख जगदीश सोळंके, वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे, वाहतूक निरिक्षक सिध्दार्थ सोनवणे, सहा.वाहतूक निरीक्षक खतीब तडवी, वाहतूक नियंत्रक बबलू तडवी, वाहतूक निरीक्षक याकूब तडवी, सहा.कार्यशाळा अधीक्षक तेजस शुक्ला, गाडी ालक बी.बी.तडवी, वाहक अफसर तडवी उपस्थित होते
ग्रामस्थांनी केले स्वागत
आदिवासी गावांना जोडणारी व शहरी भागात न येता परस्पर आदिवासी गावांना कमी खर्चात व कमी वेळेत दळण-वळणाकरीता महत्वाची ठरल्याने व सुरू झाल्याने परसाडे ग्रामपंचायत सदस्य रोशन तडवी, मदीना तडवी, खल्लोबाई तडवी, शकिला तडवी, पोलीस पाटील महेमूद तडवी सह आदींनी आगाराचे आभार मानले.


