उद्घाटनाच्या शंभर दिवसानंतर भुसावळात विकासकामांना ‘ब्रेक’

भुसावळात ठाकरे गट आक्रमक : प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन


भुसावळ (10 जानेवारी 2025) : शहरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी अमृत योजनेसह विविध विकासकामांच्या उद्घाटनाला शंभर दिवसांचा अवधी लोटला मात्र अद्यापही विकासकामांना सुरूवात झाली नसल्याने नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. या संदर्भात प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी वेळीच दखल घ्यावी अन्यथा जनतेला सोबत घेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाचे भुसावळ शहरप्रमुख दीपक धांडे यांनी गुरुवारी दिला.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या
गुरुवारी प्रांताधिकारी व पालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील पदाधिकार्‍यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. विधानसभा आचासंहिता लागण्यापूर्वी भुसावळात आमदार संजय सावकारे यांनी घाई-घाईत अनेक कामांचे भूमिपूजन करून उद्घाटन केले मात्र शंभर दिवसांचा कालावधी उलटूनही कामांना सुरूवात झालेली नाही. अमृत योजना टप्पामधील 125 कोटींच्या कामाला सुरूवात नाही तसेच अमृत योजना पहिल्या टप्प्यातील कामांना आठ वर्षानंतरही पूर्ण झालेली नाही.

या कामांनाही व्हावी सुरुवात
मुख्य बाजारामध्ये 1.5 कोटी रुपये खर्चून काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन शंभर दिवसांपूर्वी झाले मात्र अद्यापही या कामांना सुरवात नाही, तहसील ऑफिसमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाचे सुद्धा उद्घाटन करूनही शंभर दिवसांचा कालावधी उलटला मात्र एक वीट सुद्धा रचली गेली नाही, सरदार वल्लभभाई पटेल पुतळा ते गांधी पुतळापर्यंतचा रोडचे 3.50 कोटींचे काँक्रिटीकरणाचे टेंडर होवून शंभर दिवस पूर्ण झाले मात्र या रस्त्याचे काम सुरू झालेली नाही, भुसावळ शहरातील अमर स्टोअर्स ते बाजारपेठ पोलीस स्टेशनपर्यंतच्या रोड काँक्रिटीकरणासाठी तीन कोटी मंजूर होऊन या कामाचे टेंडर होवूनही कामांना सुरूवात नाही, रेल्वे स्टेशन ते गडकरी नगरापर्यंतचा रस्ता तत्काळ करावा आदी मागण्या करण्यात आल्या.

कामे सुरू न झाल्यास आंदोलन
विविध विकासकामांचे निवडणुकीपूर्वी उद्घाटन करण्यात आले मात्र प्रत्यक्षात काम होत नसल्याने जनभावना संतप्त आहेत. तातडीने विकासकामांना न अन्यथा शिवसेनेतर्फे आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ठाकरे गटाचे भुसावळ
शहरप्रमुख दीपक धांडे, निलेश महाजन, रहिम गवळी, योगेश बागुल, नरेंद्र लोखंडे, अरुण साळुंके, करण खरारे, अब्रार ठाकरे आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.