वाघाची डरकाळी : मनपासह जि.प. निवडणुका स्वतंत्र लढणार !

उद्धव सेनेची घोषणा ; शरद पवार गट, काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’


मुंबई (12 जानेवारी 2025) : शिवसेनेचा ठाकरे गटाने आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसला जय महाराष्ट्र म्हणून आगामी महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी ही अधिकृत घोषणा केली. आघाडीत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. म्हणून आम्हाला आमचे स्वबळ आजमावून पाहायचे आहे, असेही ते म्हणाले.

निवडणुका उद्धवसेनेने मविआच्या मदतीने लढल्या
उद्धवसेना काँग्रेस, शरद पवारांच्या मदतीने विधानसभा पोटनिवडणूक, 2024 ची लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणूक लढली.

निकालानंतर एकत्र येऊ शकते मविआ
उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा जाहीरपणे दिल्याने यापुढील काळात महाविकास आघाडीची सध्या तीन शकले होणे आता अटळ झाले आहे. मात्र, मनपा, जि.प.तील स्थानिक राजकारण, संख्याबळ पाहून तेथील निकालानंतर महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हे तिन्ही पक्ष मविआचा प्रयोग करू शकतात.

मविआविरुद्ध आवाज वाढला
आतापर्यंत मातोश्रीवरील आढावा बैठकांना एका जिल्ह्यातून किमान 300 पदाधिकारी असायचे. डिसेंबरअखेरच्या आढावा बैठकांना काही जिल्ह्यांतील फक्त 25 जण हजर होते. काँग्रेस, शरद पवारांसोबत जाणे म्हणजे आत्मघातच, असे त्यातील बहुतांश जणांनी उद्धव यांना बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.


कॉपी करू नका.