भुसावळकरांची चिंता मिटली : हतनूर धरणातून यंदाच्या मोसमातील पहिले आवर्तन सुटले


भुसावळ (12 जानेवारी 2025) : भुसावळ शहराला तसेच रेल्वे विभागाला पाणीपुरवठा करणार्‍या तापीनदीतील अप्पर व निम्न बंधार्‍यातील जलसाठा कमी झाल्याने. पालिका व रेल्वे विभागाने हतनूर प्रशासनाकडे पहिल्या आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार गुरुवार, 9 रोजी धरणातून यंदाच्या मोसमातील पहिले आवर्तन सोडले आहे. तापी नदीतील रेल्वे व पालिकेच्या बंधार्‍यात हे पाणी अडवून शहराला आगामी 30 दिवस पुरवठा केला जाणार आहे.

शहरवासीयांना दिलासा
हतनूर धरणात भुसावळ शहर व रेल्वे विभागाचे वार्षिक पाणी आरक्षण आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये हतनूर धरणातून आवर्तन सोडून तापीपात्रातील रेल्वे व पालिकेच्या बंधार्‍यात जलसाठा केला जातो. या बंधार्‍यातून पाण्याची उचल करुन शहर व रेल्वे विभागाला पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यानंतर आता बंधार्‍यातील जलपातळी कमी झाल्याने हतनूरमधून आवर्तनाची गरज भासली होती. यानुसार पालिका व रेल्वे विभागाने हतनूर प्रशासनाकडे मागणी केल्याने गुरुवारी दुपारी दुपारी 12 वाजता एक हजार डे क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दोन दिवस हे आवर्तन सुरु राहिल. या पहिल्या आवर्तनाचे पाणी दीपनगर औष्णिक केंद्रातील सुदगाव बंधारा, रेल्वे व भुसावळ पालिकेच्या बंधार्‍यात साठवून पाणीपुरवठा केला जाईल.

वरणगावचा प्रश्नही मिटणार
काही दिवसांपासून वरणगाव येथील पाणीप्रश्नही बिकट झाला होता. तापीनदीत वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल नदीच्या काठावर आहे. पाणीपातळी कमी झाल्याने उचल थांबली होती. आता हतनूरमधून आवर्तन दिल्यानंतर जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचणार असल्याने वरणगाव शहरातील पाणीपुरवठाही सुरळीत होऊ शकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !