पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन घेणार्या भाविकांचा बोदवडला सत्कार
बोदवड (13 जानेवारी 2025) : जैन समाज बांधवांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्या गुजरातमधील पालिताना येथील पवित्र तीर्थस्थळची पन्नास दिवसात 99 वेळा तीन हजार 700 पायर्या चढून दर्शन घेणार्या शहरातील जैन मातृशक्तीसह 11 वर्षीय बालिकेचा महावीर जिनिंगमध्ये सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ जिल्ह्यातील जैन बांधवांतर्फे आयोजित करण्यात आला. तत्पूर्वी शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
समस्त जैन समाज बांधवाचे तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्या पालिताना येथील नऊशे मंदिर असलेल्या व साडेतीन हजार पायर्या असलेल्या तीर्थांचे एक नाही तर 99 वेळा दर्शन करणार्या साधना अरविंद जैन, वैशाली अजय बरडीया, रुची गौतम बरडीया, नितल शीतल कोठारी, मनुश्री कोमल कोठारी (11), अर्हम अजय कोठारी (10), आयुष्य विरेंद्र रेदासनी (13), संकेत गौतम बरडीया यांची वर घोडासह कलश यात्रा काढण्यात आली. अत्यंत कठीण समजली जाणारी यात्रा 50 दिवसात पूर्ण करून शहरात परतल्यानंतर बोदवड जैन श्री संघ यांच्यासह जिल्ह्यातील समस्त जैन समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जैन मंदिरापासून सजवलेल्या रथात मिरवणूक काढण्यात आली.






