ऑनलाईन अ‍ॅपद्वारे तिकीट बुकींग : भुसावळ रेल्वे विभागाला 71 लाखांचा महसूल

डिसेंबर 2024 मध्ये 2.56 लाख प्रवाशांचा पेपरलेस तिकीटावर भर


भुसावळ (17 जानेवारी 2025) : तिकीट खिडकीवर मिळणार्‍या तिकीटासाठी तास न् तास रांगेत उभे राहण्यापासून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुटका केली आहे. युटीएस ऑन मोबाईल अ‍ॅपची सुविधा प्रवाशांसाठी वरदान ठरत आहे. जागरूकता अभियान आणि डिजिटल सेवांच्या प्रोत्साहनामुळे हे अ‍ॅप प्रवाशांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत असून गत वर्षातील डिसेंबर 2024 महिन्यात 2.56 लाख प्रवाशाीं याद्वारे तिकीट काढल्यानंतर रेल्वेला तब्बल 70.73 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.

मोबाईल तिकीटिंग अ‍ॅपचे फायदे
डिसेंबर 2024 दरम्यान भुसावळ विभागात दोन लाख 56 हजार 198 प्रवाशांनी यूटीएस ऑन मोबाईल अ‍ॅपचा वापर करून तिकीट बुक केले. याद्वारे भुसावळ विभागाला 70.73 लाखांचे महसूल प्राप्त झाला आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवरील अनारक्षित तिकीट काऊंटरवरील लांब रांगेतून प्रवाशांची सुटका होवून वेळेचीही बचत झाली. कुठूनही व कधीही तिकीट बुक करण्याची सुविधा या अ‍ॅपद्वारे असल्याने प्रवाशांना आता रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही तसेच कागदाची बचत होत असल्याने पर्यावरणपूरक पेपरलेस तिकीटिंगचा अनुभव व डिजिटल पेमेंटमुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळत आहे.

यूटीएस ऑन मोबाईल अ‍ॅप : सोपे आणि सुरक्षित तिकीटिंग साधन
अनारक्षित तिकीट प्रवाशांसाठी वेळेची बचत आणि तणावरहित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी यूटीएस ऑन मोबाईल अ‍ॅप अत्यंत उपयुक्त आहे. प्रवाशांनी डिजिटल सुविधेचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा तसेच भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर यूटीएस ऑन मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.


कॉपी करू नका.