विकासाची एक्सप्रेस सुसाट : चाळीसगावकरांना नवीन वर्षात नवीन दोन रेल्वे पुल मिळणार .!

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी संक्रांतीच्या दिवशी रेल्वे व नगरपालिका अधिकारी यांच्यासोबत केली जागेची पाहणी


चाळीसगाव (17 जानेवारी 2025) : शहरातून जाणार्‍या जळगाव-मनमाड रेल्वे लाईनवर 52 वर्ष जुना रेल्वे ओव्हर ब्रिज आहे. 1972 मध्ये बांधण्यात आलेला हा 52 वर्ष जुना, 25.50 मीटर स्पॅनचा स्टील गर्डर आरओबी, धुळे रोड आणि मालेगाव रोडला मुख्य चाळीसगाव शहराशी जोडणारा एकमेव पूल आहे. हा दोन पदरी रेल्वे ब्रिज चाळीसगावच्या सध्याच्या रहदारीसाठी पुरेसा ठरत नाही. गेल्या 52 वर्षात शहराचा विस्तार झपाट्याने झाला असून त्यामुळे चाळीसगाव शहरात येणार्‍या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची आणि जनतेची खूप गैरसोय झाली आहे. काही वेळा अपघात झाल्यास किंवा अवजड वाहनांची रहदारी वाढल्यास सदर रेल्वे ओव्ह ब्रिज वर तास न तास वाहतुकीचा खोळंबा होतो. यासोबतच आता नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत देखील रेल्वे ब्रिजच्या बाजूला स्थलांतरित झाली असून त्याव्यतिरिक्त 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, नाट्यगृह आणि इतर विविध शासकीय कार्यालये आणि निवासी वसाहती देखील पुलाच्या बाजूला असणार्‍या शासकीय जागेवर उभे राहत असल्याने साहजिकच रेल्वे पुलावरून वाहतूक वाढली आहे.

ही बाब लक्षात घेत, व शहर विकासाचे पुढील 50 वर्षाचे व्हिजन लक्षात घेता काही महिन्यांपूर्वीच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी महाराणा प्रतापसिंह चौक लोकार्पणप्रसंगी नवीन रेल्वे ब्रिज उभारण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्यांनी आपला दिलेला शब्द खरा ठरवत चाळीसगाव शहरातील सद्यस्थितीत असलेल्या जुन्या रेल्वे ब्रिजच्या जागी नवा चारपदरी रेल्वे ओव्हर ब्रिज मंजूर केला आहे.

विशेष म्हणजे या नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या बाजूलाच रेल्वे भुयारी मार्ग (अंडर ब्रिज) तयार केला जाणार आहे. याबाबत सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून संक्रांतीच्या दिवशी आमदार मंगेश चव्हाण यांनी रेल्वे विभागाचे अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह जुन्या रेल्वे उड्डाणपूल व परिसराची पाहणी केली.


कॉपी करू नका.