वीज कंपनीचा सीईओ भासवून धुळ्यातील कंत्राटदाराला 13 लाखांचा गंडा : सुरतचे त्रिकूट जाळ्यात

धुळे सायबर पोलिसांची कारवाई : फसव्या कॉलपासून सतर्कतेचे आवाहन


Impersonating as CEO of power company, duped contractor in Dhule of Rs 13 lakhs: Surat trio caught धुळे (17 जानेवारी 2025) : वीज महावितरण कंपनीचा सीईओ बोलत असल्याचे भासवून हॉस्पीटल कामासाठी तातडीने पैसे लागत असल्याचे भासवून वीज कंपनीच्या कंत्राटदाराला 13 लाखांचा गंडा घालण्यात आला होता. सायबर शाखेने या गुन्ह्याची उकल करीत सुरतच्या त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींच्या अटकेने काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यशवंत काशीनाथ पाटील, जयशंकर गोपाल गोसाई, विजय शिवहरी शिरसाठ (सर्व रा.सुरत) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असे आहे फसवणूक प्रकरण
धुळ्यातील जय श्रीकृष्ण इंटरप्रायजेसचे मालक जिजाबराव आनंदराव पाटील यांना 13 सप्टेंबर 2024 रोजी वीज महावितरण कंपनीचे एमडी लोकेश चंद्रा यांच्या नावाने आलेल्या कॉलरने कॉल करीत आपण संचालकांच्या बैठकीत असून माझे काका सुरतच्या रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या उपचारासाठी आठ लाख रुपये हवे असल्याचे सांगत सायंकाळी पैसे परत करण्यात येतील, असे समोरील व्यक्तीने सांगितल्याने पाटील यांनी बोलण्यावर विश्वास ठेवत आरटीजीएसने आठ लाख रुपये पाठवले तर त्यानंतर पुन्हा दोन तासांनी फोनवर पाच लाखांची मागणी करण्यात आल्यानंतर पुन्हा पैसे पाठवण्यात आले. सायंकाळी पाटील यांनी संबंधित क्रमांकावर फोन लावला असता क्रमांक बंद आल्याने संशय वाढला व खातरजमा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर शाखेने तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी निष्पन्न करीत त्यांना बेड्या ठोकल्या.

यांनी केली आरोपींना अटक
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, जगदीश खैरनार, खलाणेकर, राजू मोरे, मराठे, तुषार पोतदार आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.