एक हजारांची लाच भोवली : पिंपळकोठा जि.प.शाळेतील मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
Principal of Pimplekotha ZP school in the net of ACB एरंडोल (20 जानेवारी 2025) : एरंडोल शिक्षण विस्तार अधिकार्यांनी केलेल्या तपासणीत शाळेला चांगला शेरा देण्यासाठी शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजारांची लाच एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने मागितली. अन्य शिक्षकांनी पैसे दिले असलेतरी एका शिक्षकाने जळगावात एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर मुख्याध्यापकाला एक हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीने बेड्या ठोकल्या. बळीराम सुभाष सोनवणे (55) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, लाच प्रकरण ज्यांच्यामुळे घडले त्या एरंडोल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील यांच्याविरोधातही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे लाच प्रकरण
पारोळा तालुक्यातील 37 वर्षीय तक्रारदार हे प्राथमिक शाळा पिंपळकोठा जि..प.शाळेत शिक्षक आहेत. एरंडोल शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी.पाटील यांनी गेल्या सोमवारी जि.प.शाळेचे इन्स्पेक्शन केले होते. शाळेचे इन्फेक्शन करत असताना शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चांगला शेरा लिहावा म्हणून 10 हजार रुपये मागितले आहेत, असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे यांनी शाळेतील प्रत्येक शिक्षकाकडून एक हजार रुपये स्वीकारले मात्र तक्रारदारासह अन्य शिक्षकांनी दोन हजार रुपये देण्यास विरोध दर्शवत जळगाव लाचलुचपत विभागाला या संदर्भात तक्रार केली.
लाच स्वीकारताच मुख्याध्यापकाला अटक
सोमवारी जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई करत मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांना अटक केली. शिक्षण विस्तार अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केल्यानंतर दोन हजार रुपये मिळाल्याबद्दल विरोध दर्शवला नाही व नंतर कॉल करतो, असे सांगून फोन ठेवला. लाच मागणीत जे.डी.पाटील यांचाही सहभाग दिसून आल्यानंतर त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्यासह पथकाने यशस्वी केला.