नाराज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गावी परतले : महायुतीत वादाची ठिणगी


Angry Deputy Chief Minister Eknath Shinde returns to his hometown: sparks controversy in the Mahayuti मुंबई (20 जानेवारी 2025) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात न घेता पालकमंत्रिपदाचा निर्णय घेण्यात आल्यानंतर शिंदे थेट दरे या आपल्या मूळ गावात दाखल झाले आहेत. महायुतीत वादाची ठिणगी पडल्याने राजकीय वर्तुळात विविध अफवा व चर्चांना ऊत आला आहे. भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आता नाराज शिंदेंची मनधरणी करण्याची जवाबदारी देण्यात आल्याचे वृत्त आहे.

या कारणास्तव शिंदे नाराज
नाशिकचे पालकमंत्रिपद शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांना तर रायगडचे पालकमंत्रिपद भरत गोगावले यांना मिळावे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपने आपल्याकडे घेत रायगडमध्येही राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदाबाबत भ्रमनिरास झाल्याने दुखावलेले एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी केलेल्या नियुक्तीला स्थगिती दिली.

नाराज नेत्यांकडून पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार
शिंदेसेनेला रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करायची होती. रायगड जिल्ह्यात गोगावले यांचे भावी पालकमंत्री असे बॅनरही लागले होते, मात्र अदिती तटकरेंची नियुक्ती झाल्याने गोगावले यांनी दुसर्‍या कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता. नाशिकच्या पालकमंत्रिपदी महायुतीत शिंदेसेनेचे दादा भुसे होते. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपने घेऊन तिथे गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्याने भुसे नाराज होते, त्यातून त्यांनी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री न घेण्याचे ठरवले होते असे समजते. या वादातूनच मुख्यमंत्र्यांना या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली.

 


कॉपी करू नका.