जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास एकमेव पर्याय : कवी नामदेव कोळी


भुसावळ (28 जानेवारी 2025) : महाविद्यालयीन जीवन हे आपल्या कायम स्मरणात असते. या काळातच आपली प्रतिभा बहरून येते आणि ती बहरून येण्यासाठी नवनवीन पुस्तके वाचली पाहिजे. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या लेखकांच्या मुलाखती वाचून आपण आपली शब्दसंपदा वाढवावी. जीवनात यश संपादन करायचे असेल, तर अभ्यासच एकमेव पर्याय असून यशाला कुठलाही शॉर्टकट नाही, असे विचार कवी नामदेव कोळी यांनी व्यक्त केले. शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

कोटेचात लेखक आपल्या भेटीला
कवी कोळी म्हणाले की, मराठीला कोणीही दुय्यम समजू नये. आपल्याला जर उत्तम भाषेची जाण असेल तर भारत सरकारच्या मंत्रालयामध्ये तुम्हाला अनुवादक म्हणून नोकरीची संधी आहे. भाषा संचलनालय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ‘मराठी भाषा आणि नोकरीच्या संधी’ यावर व्याख्याने घेऊन जनजागृती करीत आहे, असे प्रतिपादन नामदेव कोळी यांनी केले. लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात नामदेव कोळी यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा.विनोद भालेराव यांनी विद्यार्थिनींना करून दिला. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर, उपप्राचार्य डॉ.शरद अग्रवाल, मराठी विभाग प्रमुख प्रा.विनोद भालेराव, प्रा.निलेश गुरुचल, डॉ.गिरीश कोळी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कॉपी करू नका.