भुसावळ पालिका अ‍ॅक्शन मोडवर : 11 लाख थकल्याने इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरला सील


भुसावळ (30 जानेवारी 2025)  : नगरपालिकेने आता थकीत कर वसुलीसाठी थेट कारवाई सुरू केली आहे. याच कारवाईच्या अनुषंगाने शनी मंदिर वॉर्डातील इंडस मोबाईल टॉवर कंपनीकडे असलेल्या थकीत 11 लाख रुपयांच्या वसूलीसाठी प्रशासनाने टॉवर सील करताच शहरातील थकबाकीदारांच्या गोटात खळबळ उडाली.

थकबाकीपोटी कारवाईने खळबळ
पालिकेला यंदाचे आर्थिक वर्ष व मागील थकबाकी मिळून 47 कोटी पाच लाख 51 हजार रुपये रक्कम वसूल करायची आहे. मात्र अजून 20 टक्केही वसुली झालेली नाही. वसुलीअभावी पालिकेला शासनाकडून मिळणारे 14 व 15 वा वित्त आयोग, दलित वस्ती व दलितेतर वस्ती अनुदान, विशेष रस्ता अनुदान, वैशिष्टपूर्ण कामे योजना अनुदान व विकास निधींला कात्री लागण्याची भीती आहे. एप्रिल 2024 ते 15 जानेवारी 2025 या साडेआठ महिन्यांच्या काळात पालिकेने सरासरी सा कोटींची वसुली केली आहे.

अद्यापही प्रशासनाला मागील थकबाकी मिळून तब्बल 40 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे मात्र ही रक्कम वसूल होत नसल्याने प्रशासनाने धडक वसूली मोहिम सुरू केली. मंगळवारी सायंकाळी शनी मंदिर मंदिर वाॐर्ड वसुली भाग क्रमांक पाचमधील इंडस मोबाईल टॉवरचे मालमत्ता कर 11 लाख रुपये थकीत असल्याने ते टॉवर सील करण्यात आले. उपमुख्याधिकारी शेख परवेज अहमद, प्रशासकीय अधिकारी अजित भट, अनिल लाहुजा, विष्णू राठोड, दीपक अहिरे, मुकेश पाटील, लिपिक गोपाल पाली, सुनील पाटील व तौसीफ खान इत्यादींनी कारवाई केली.

 


कॉपी करू नका.