पक्क्या निर्धारानंतर यशस्वी उद्योजक होणे शक्य : उद्योजिका सुनीता जोशी

भुसावळ (31 जानेवारी 2025) : विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता आपल्या अवतीभवती असणार्या नैसर्गिक तथा भौतीक उपलब्धतेतून स्वयंरोजगारासाठीच्या संधी ओळखाव्यात. त्यातून उद्योग व्यवसाय उभारावा. निर्धार पक्का असल्यास यशस्वी उद्योजक होता येते, असे मत उद्योजिका सुनीता जोशी यांनी पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नाहाटा महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवती सभा अंतर्गत आत्मनिर्भर युवती कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे होते.
यांची होती विचार मंचावर उपस्थिती
प्रमुख वक्ते खान्देशातील महिला उद्योजक सुनीता जोशी होत्या. व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.व्ही.ए.सोळुंके, डॉ.विद्या पाटील, डॉ.ममता पाटील, प्रा.संगीता भिरुड उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा.व्ही.ए.सोळुंके यांनी केले. डॉ.ममताबेन पाटील यांनी विद्यार्थिनींनी विशिष्ट ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन केले.
डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी विद्यार्थिनींनी उद्योजकता गुण अंगी बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी संध्या वराडे तर पाहुण्यांचा परिचय चतुर्थी फेगडे हिने व आभार डॉ विद्या पाटील यांनी मानले.
यशस्वीतेसाठी प्रा.संगीता भिरुड, डॉ.नीलिमा चौधरी, डॉ.एस.के. राठोड, शिवाजी बिजागरे, साक्षी जैन, शारदा मराठे, पायल बारी, सरोज चौधरी यांनी परिश्रम घेतले.


