अनैतिक संबंधात आर्थिक देवाण-घेवाणीचा वाद : 29 वर्षीय प्रियकराने महिलेला संपवले


Dispute over financial exchange in an immoral relationship: 29-year-old boyfriend kills woman अंबरनाथ (4 फेब्रुवारी 2025) : पतीपासून विभक्त राहणार्‍या महिलेसोबत सूत जुळल्यानंतर उभयंतांमध्ये आर्थिक व्यवहार झाले व पैसे महिलेने परत मागितल्याने वाद वाढू लागले व त्यातूनच संतप्त प्रियकराने महिलेची हत्या केली. ही घटना अंबरनाथ पूर्व-पश्चिम जोडणार्‍या ब्रीजवर घडली.

काय घडले नेमके
या घटनेत सीमा कांबळे (35) हिला मृत्यू झाला तर आरोपी राहुल भिंगारकर (29) हा पसार झाला आहे. सीमा कांबळे ही विवाहित होती मात्र ती पतीपासून विभक्त राहत होती. तिचे आणि राहुलचे प्रेमसंबंध संबंध होते आणि त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणही झाली होती. सीमाने राहुलला हात उसने पैसे दिले होते मात्र पैसे परत करण्यास राहुल टाळाटाळ करत होता.

सीमा सतत त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती आणि पर्यायी मार्ग म्हणून लग्न करण्याची मागणी करत होती. ‘पैसे दे नाहीतर लग्न कर’ असा दबाव ती राहुलवर टाकत होती. यामुळे दोघांमध्ये वाद वाढत चालला होता.

भरदिवसा ब्रीजवरच थरार
सोमवारी अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या ब्रीजवर सीमा आणि राहुल यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि संतप्त झालेल्या राहुलने धारदार शस्त्राने सीमावर हल्ला केला. रक्तबंबाळ झालेल्या सीमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भरदिवसा घडल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक तपासात हत्येच्या मागील कारण शोधून काढले असून आरोपी राहुल भिंगारकर पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणामुळे अंबरनाथ परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू आहे. प्रेमसंबंध आणि आर्थिक वादाचे भीषण परिणाम किती गंभीर असू शकतात, याचे हे ताजे उदाहरण आहे.

 


कॉपी करू नका.