भुसावळातील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा : 27 सिलिंडरसह दोघे जाळ्यात

Raid on illegal gas refilling center in Bhusawal : Two arrested with 27 cylinders भुसावळ (8 फेब्रुवारी 2028) : शहरातील नसरवांजी फाईल, शिवाजीनगर भागात वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस सिलिंडरमधून गॅस भरला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास पथकाने छापेमारी केली. यावेळी भरण्यासाठी आलेल्या अॅटो रिक्षासह 27 गॅस सिलिंडर व सिलिंडर रिफिलिंगसाठी लागणार्या साहित्यासह दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईने अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. शहरातील अनेक भागात बिनदिक्कतपणे अद्यापही गॅस रिफिलिंग होत असल्याने पोलीस प्रशासनाने व पुरवठा विभागाने दखल घेण्याची अपेक्षा आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
संशयीत शेख नौशाद हा अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून ऑटो रिक्षात गॅस रिफिल करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास छापेमारी केली. यावेळी शेख नौशाद शेख नजीर (31, रा.शिवाजीनगर, नसरवांजी फाईल, भुसावळ) याच्या टपरीमधून 27 गॅस हंड्या, एक ऑटो रिक्षा तसेच गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य मिळून एक लाख 57 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले. ऑटो रिक्षामध्ये घरगुती गॅस भरण्यासाठी आलेला रिक्षा चालक निलेश सुरेश चौधरी, (रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) व शेख नौशाद शेख नजीर यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ, भारत पाटील आदींच्या पथकाने केली.
भुसावळातील पुरवठा विभागाला जाग येणार कधी ?
शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर गॅस रिफिलिंग वाहनांमध्ये बिनदिक्कत सुरू आहे तर हॉटेल्ससह ढाब्यांवर तसेच खाद्य पदार्थ विक्रीच्या दुकानावर घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात असताना शहरातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला या बाबी दिसत नसल्याने सर्वसामान्य जनतेत आश्चर्य व्यकत होत आहे. मरगळ झटकून पुरवठा विभागाने कारवाई करावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.


