साखर गोळा करण्याच्या आदेशाचा यावलला मनसेकडून निषेध


यावल (9 फेब्रुवारी 2025) : यावल पंचायत समितीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून शुक्रवारी निवेदन देत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत साखर गोळा करण्याच्या आदेशाचा तीव्र निषेध करण्यात आला व हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पंचायत समितीत निवेदन देण्यात आले

शासनाने निर्णय मागे घेण्याचे आवाहन
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना गोडधोड खाऊ देण्यासाठी शाळा प्रशासनाला लोकसहभागातून साखर गोळा करण्याचे आदेश देण्याचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्णय घेतला या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. शिक्षक व शिक्षिका हे शैक्षणिक क्षेत्राचे आधारस्तंभ आहेत परंतु या आदेशामुळे त्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित न करता साखर गोळा करण्यासाठी घराघरांत जावे लागणार आहे. हा निर्णय शिक्षकी पेशाचा अपमान असून शैक्षणिक व्यवस्थेची थट्टा करणारा आहे. हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

राज्य भिकेला लागले नाही
महाराष्ट्र राज्य भिकेला लागलेले नाही, असे सांगत शिक्षकांना या प्रकारात अडकवू नये. शासनाने शिक्षकी पेशाची गरिमा राखावी. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, शिक्षकांना त्यांच्या मूळ शैक्षणिक कार्यात संपूर्ण मोकळीक द्यावी, शाळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या विनामूल्य साहित्य संकलनाचा आग्रह टाळावा जर शासनाने हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने संपूर्ण तालुक्यातील सर्व शाळांमध्ये साखर भेट आंदोलन करण्यात येईल यामुळे शिक्षण विभागाची नाचक्की होईल. याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे, मनसे शेतकरी सेना जिल्हा सचिव अमोल पाटील, मनविसे तालुका उपाध्यक्ष उदय पाटील, चैतन्य महाजन सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


कॉपी करू नका.