अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारीनंतर रावेरात अधिकारी फैलावर

आमदार अमोल जावळे यांनी तत्काळ अवैध वाळू उपसा थांबवण्याचे दिले निर्देश


रावेर (13 फेब्रुवारी 2025) : रावेर तालुक्यातील सुकी नदीतून तीन जेसीबीद्वारे दिडशे ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असताना महसूल प्रशासन या प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याची तक्रार भाजप पदाधिकार्‍यांनी आढावा बैठकीत केली. यानंतर आमदार अमोल जावळे यांनी संतप्त होत अधिकार्‍यांना जाब विचारत तत्काळ हा प्रकार थांबवण्याचे निर्देश दिले. केंद्र व राज्य सरकारतर्फे जनहिताच्या योजना राबविण्यात येतात व या योजनेचा लाभ तळागाळातील लाभार्थींना पोहचला पाहिजे त्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले पाहिजे मात्र काही कर्मचारी लाभार्थींची अडवणूक करीत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही व अशा अधिकारी व कर्मचार्‍यांचीदेखील गय केली जाणार नाही, अशी तंबी आमदार अमोल जावळे यांनी आढावा बैठकीत दिली.

विविध विभागांच्या तक्रारी
आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार बी.ए.कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तहसील कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक गुरुवारी झाली. महसूल, कृषी, पंचायत समिती, घरकुल, भूमी अभिलेख आदी विभागांबाबत तक्रारी नोंदवण्यात आल्या. यावेळी भाजपचे दुर्गादास पाटील यांनी सुकी नदीतून दररोज तीन जेसीबीच्या सहाय्याने 150 ट्रॅक्टर ट्रॉलीने अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याचा आरोप केला. महसूल प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे लाखों रुपयांचे नुकसान होत आहे तसेच उत्खननामुळे भविष्यात नदीच्या प्रवाहात बदल होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या आरोपांवर तहसीलदारांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार अमोल जावळे यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना तातडीने गौण खनिज वाहतूक करणार्‍यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

घरकुल लाभार्थींची पैशांसाठी अडवणूक
रावेर पंचायत समितीत घरकूल लाभार्थ्यांची संबंधित कर्मचारी अडवणूक करतात. घरकुलासाठी दहा-दहा हजार रुपये घेतली जातात, असा आरोप एका कार्यकर्त्यांने बैठक केला. लाभार्थींची अडवणूक करणार्‍याची गय केली जाणार नाही, अशी तंबी आमदार अमोल जावळे यांनी यावेळी दिली.

यांची होती उपस्थिती
गटविकास अधिकारी के.पी.वानखेडे, कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, नगरपालिका मुख्याधिकारी समीर शेख, भाजप जेष्ठ नेते सुरेश धनके, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, कृउबा सभापती सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, सी.एस.पाटील, गोपाळ नेमाडे, दुर्गादास पाटील, तालुकाध्यक्ष महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सरचिटणीस दुर्गेश पाटील, दिलीप पाटील, अतुल महाजन, उमाकांत महाजन, हरलाल कोळी, अ‍ॅड.सूर्यकांत देशमुख, चेतन पाटील, विजय महाजन, संदीप सावळे, पी.के.महाजन, अजिंक्य वाणी तसेच सार्वजनिक बांधकाम, एकाात्मिक बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.