कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्ष शिक्षा व 50 हजारांचा दंड : काय आहे नेमके प्रकरण !


Agriculture Minister Manikrao Kokate sentenced to two years in prison and fined Rs. 50,000 मुंबई (21 फेब्रुवारी 2025) : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंड सुनावण्यात आला आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. या प्रकारामुळे कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आल्याचे बोलले जात असून त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दावा सोडला जाण्याची शक्यता आहे. 1995 मधील एका प्रकरणात ही शिक्षा न्यायालयाने सुनावली.

असे आहे प्रकरण
1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात याचिका दाखल केली.. आमच्याकडे घर नाही आणि आमचे उत्पन्न कमी असल्याचे सांगून माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांनी मुख्यमंत्री निधीतील सदनिका घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर भादंवि कलम 420 (फसवणूक), 465 (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि 474 (सत्यता लपवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता.30 वर्षांनंतर या खटल्याचा आज नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनिल कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सुनावणीला माणिकराव कोकाटे स्वतः जिल्हा न्यायालयात हजर होते.


दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन तासांतच कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला. माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला असला, तरी त्यांना पुढील 30 दिवसांत सत्र न्यायालयात अपील करावे लागणार आहे.

कोकाटेंच्या आमदारकी, मंत्रीपदावर टांगती तलवार
या प्रकरणामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. त्यांच्या आमदारकी आणि मंत्रीवर टांगती तलवार आहे. कारण लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागू शकतो.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !