भुसावळकर ‘एक शाम लखदातार के नाम’ संकीर्तनात मंत्रमुग्ध
भुसावळ (22 फेब्रुवारी 2025) : श्री श्याम जगताचे प्रसिद्ध गायक, जो राम को लाये है हम उनको लायेंगे फेम कन्हैय्या मित्तल यांच्या सुमधूर वाणीतून वांजोळा रोडवरील स्टार लॉन समोरील मोकळ्या जागेवर ‘एक शाम लखदातार के नाम’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी रात्री करण्यात आले. शहरातील श्री श्यामप्रेमी परिवारातर्फे आयोजित या कार्यक्रमात शहरासह तालुक्यातील सुमारे 30 हजार भाविक सहभागी होवून संकीर्तनात मंत्रमुग्ध झाले. मंदसौर येथील अधिष्ठा व अनुष्का भटनागर या गायिका यांनीही गीते, भजने सादर केली.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार गुरुमुख जगवानी, सालासर बालाजी व खाटू शाम मंदिराचे दोन्ही पुजारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.गायक कन्हय्या मित्तल हे भुसावळ येथील या कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले. वांजोळा रोडवरील स्टार लॉनसमोरील आठ एकरच्या मोकळ्या जागेत कार्यक्रम झाला. शहरासह ग्रामीण भागातील भाविक विविध वाहनांद्वारे कार्यक्रमास दाखल झाले. सुमारे 30 हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याचा अंदाज आहे. पोलिसांकडून चोख बंदोबस्त राखण्यात आला.

