स्वतःच उद्योजक होवून अन्य बेरोजगारांनाही रोजगार द्या वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

भुसावळातील रोजगार मेळाव्यात 186 युवकांची निवड : मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ (22 फेब्रुवारी 2025) : बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असल्याने साहजिकच नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धादेखील वाढली आहे. उपलब्ध नोकर्‍या व बेरोजगारांची संख्या पाहता सर्वांनाच नोकरी मिळणे अशक्य आहे त्यामुळे युवकांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःच उद्योजक होवून अन्य चार बेरोजगारांना संधी द्यावी, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे केले. भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळ, समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या माध्यमातून बेरोजगार युवकांच्या हातांना काम मिळण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवार, 22 रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील संतोषी माता सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्यासाठी सुमारे दिड हजार युवकांनी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी केली. यावेळी 650 युवकांची मुलाखत घेण्यात येवून 186 युवकांना निवडण्यात आले.

एआयमुळे नोकर्‍या धोक्यात : मंत्री सावकारे
मंत्री संजय सावकारे म्हणाले की, बेरोजगारीचा भस्मासूर दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे प्रत्येकाने नोकरीच्या मागे न धावता स्वतः उद्योजक व्हावे व अन्य चार बेरोजगारांना नोकरीची संध्या द्यावी. सध्या एआय प्रणाली आल्यामुळे नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत व या प्रणालीमुळे भविष्यात एम्प्लॉयमेंट राहिली की नाही हीदेखील शंका आहे. याच पगाराची व हीच नोकरी हवी, असा अट्टहास न करता जी नोकरी मिळेल ती स्वीकारा व तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला हवी ती संधी निश्चित मिळेल, असेही मंत्री सावकारे म्हणाले. खाजगी क्षेत्रात आपण स्वतः देखील काम केले असून सर्व अनुभवातून आपण राजकीय क्षेत्रापर्यंत मजल गाठली आहे. मुळातच मराठी मुलगा मुलाखतीला प्रचंड घाबरतो त्यामुळे तो अडकून पडतो मात्र मुलाखतीची कुठलीही भीती न बाळगता दडपण बाजूला सारून सामोरे जा, निश्चित यश मिळेल, असेदेखील ते म्हणाले.


अपयशाने खचून जावू नका
अनेक कंपन्यांच्या माध्यमातून जागेवरच कुशल-अकुशल युवकांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी खचून न जाता आपले प्रयत्न सुरू ठेवावेत, असेही मंत्री संजय सावकारे म्हणाले. दीपनगरातील 660 प्रकल्पातून व्यावसायीक वीज निर्मिती सुरू होणार असून या प्रकल्पातून रोजगाराची उपलब्धता होणार आहे. केवळ कुशलच नव्हे तर अकुशल कर्मचार्‍यांची आवश्यकता असते, असेही ते म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जळगाव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त संदीप ज्ञा.गायकवाड, समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष जयंतीलाल सुराणा, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, सर्जना मेडिया सोल्यूशन्स प्रा.लि.चे कार्यकारी संचालक संचालक रवींद्र लढ्ढा आदींची उपस्थिती होती.

नोकरी करण्याऐवजी स्वतःच मालक व्हा : पालकमंत्री
प्रत्येकाला नोकरीची संधी मिळते, परंतु आपल्यामध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही. सध्याची मानसिकता काय आहे तर नोकरी आहे तर छोकरी आहे पण ही मानसिकता बदलली पाहिजे. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की ‘मी नोकरी करणार नाही, मात्र मालक होवून नोकरी करणार्‍यांना कामाला लावेल. जो पर्यंत तुम्ही अशी मानसिकता करणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. पालकमंत्री म्हणाले की, माणसाने चोरी करायची लाज ठेवावी, बाकी कोणत्याच कामाची लाज बाळगू नये. आपल्या हातात येईल ते काम आपण केले पाहिजे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराची दालने खुली झाली आहे. जे काम मिळेल ते काम आपण केले पाहिजे. जीवनात चढ-उतार येतात, पण मिळेल त्या संधीचे सोने आपण केले पाहिजे.

शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळणार : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, पुणे-चिंचवडच्या धर्तीवर भुसावळचाही विकास होणार आहे. भुसावळ शहरात आयोजित या मेळाव्याच्या माध्यमातून भुसावळलाही उद्योग नगरी करण्यात येईल. या मेळाव्यातून शेकडो बेरोजगारांच्या हातांना रोजगार मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

रोजगाराला कुठूनतरी सुरूवात करा : पोलीस अधीक्षक
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी म्हणाले की, रोजगाराला कुठून ना कुठून सुरूवात करायला हवी. हीच खुर्ची हवी या भानगडीत पडू नका त्यामुळे वेळ वाया जातो, असे सांगून ते युवकांना म्हणाले की, थांबून राहू नका, शिकत रहा, यश निश्चित मिळेल.

मेळाव्याला यांचे लाभले सहकार्य
या मेळाव्याला जळगावच्या श्री केशव स्मृती प्रतिष्ठान, भुसावळातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवमुद्रा प्रतिष्ठान, कवयित्री बहिणाबाई चोधरी विद्यापीठ, जळगाव जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जळगावातील श्री जी.एम.फाउंडेशनचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव समकित सुराणा, सूत्रसंचालन एम.बी.देशपांडे व आभार रजनी सावकारे यांनी मानले.

स्वयंरोजगारासाठी युवकांना मार्गदर्शन
भुसावळातील मेळाव्यात स्थानिक तरुणांना स्थानिक स्तरावरच व जिल्ह्यात रोजगार मिळावा या दृष्टीने जळगावसह भुसावळच्या कंपन्यांना प्राधान्य देण्यात आले या शिवाय अहिल्यानगर, नाशिक व पुण्यातील कंपन्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ज्या युवकांना नोकरी ऐवजी स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यांना आठ महामंडळांमार्फत राबवल्या जाणार्‍या योजनांची माहिती स्वतंत्र स्टॉलद्वारे देण्यात आली. विविध योजनांद्वारे मिळणारे कर्ज, सवलत व पात्रता यावेळी समजावून सांगण्यात आल्या. भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनी मेळाव्यात उपलब्ध रोजगाराच्या संधीबाबत सविस्तर माहिती दिली.

30 प्रतिष्ठीत कंपन्यांचा सहभाग
रोजगार मेळाव्यात जळगाव, भुसावळ, धरणगाव व नाशिक, अहिल्यानगर, नाशिक येथील 30 उद्योजक व आस्थापनांनी सहभाग नोंदवला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !