क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणूक : पुण्यासह नांदेड, कोल्हापूर, दिल्लीत सीबीआयचे छापे

नवी दिल्ली (25 फेब्रुवारी 2025) : सीबीआयने क्रिप्टो फसवणूक प्रकरणांमध्ये देशभरात 60 ठिकाणी छापे टाकले. पुणे, नांदेड, कोल्हापूर, दिल्ली एनसीआर, चंदीगड, बंगळुरुसह अनेक मोठ्या शहरांमध्ये छापे टाकण्यात आले असून बनावट वेबसाइट्सद्वारे फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
2015 पासून घोटाळा
क्रिप्टोकरन्सीशी संबंधित हा घोटाळा 2015 मध्ये सुरू झाला, ज्यामध्ये अमित भारद्वाज (मृत), अजय भारद्वाज आणि त्यांच्या एजंटचा समावेश होता. या लोकांनी ॠरळपइळींलेळप आणि इतर अनेक नावांनी वेबसाइट तयार केल्या आणि लोकांना पॉन्झी स्कीम अंतर्गत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायला लावली होती. या सर्व वेबसाइट्स व्हेरिएबलटेक पीटीई लि. नावाच्या कंपनीद्वारे नियंत्रित केल्या जायच्या.
क्रिप्टोकरन्सी फसवणूक करणारे अमित भारद्वाज (मृत) आणि अजय भारद्वाज यांनी गुंतवणूकदारांना या योजनेत 18 महिन्यांसाठी बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते. त्या बदल्यात त्यांनी 10 टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. गुंतवणूकदारांना एक्सचेंजेसमधून बिटकॉइन खरेदी करण्यासाठी आणि क्लाउड मायनिंग कराराद्वारे गेनबीटकाईनसह गुंतवणूक करण्यास देखील प्रोत्साहित केले गेले.
आरोपींनी गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी सुरुवातीला त्यांना परतावा दिला परंतु 2017 मध्ये गुंतवणूकदारांची संख्या कमी झाल्यानंतर ही योजना फ्लॉप झाली आणि आरोपींनी गुंतवणूकदारांचे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांचे पैसे इन-हाऊस एमसीपी क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलले, ज्याचे मूल्य वास्तविक मूल्यापेक्षा खूपच कमी होते.
