पाल्याला कॉपी पुरवताना नायब तहसीलदार ताब्यात


अहिल्यानगर (27 फेब्रुवारी 2025) : राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा दावा भलेही शिक्षण विभागाकडून होत असलातरी अनेक ठिकाणी परीक्षेला गालबोट लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातच अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर महसूल व शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. तोरडमल असे या रंगेहाथ पकडलेल्या नायब तहसिलदारांचे नाव असल्याच समजते.

बारावी बोर्ड परीक्षेमध्ये स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश दिले आहेत. पण आता नायब तहसीलदार आपल्या पाल्याला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडल्या गेल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार? शिक्षकांसारखे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बोर्ड परीक्षेच्या परीक्षा केंद्र भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व 100 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्ण प्रतिबंध घालण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल) जवळ ठेवणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित असल्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !