अल्पवयीन मुलींची यात्रेत छेडखानी : मुक्ताईनगरातील दोषींच्या अटकेसाठी मंत्री रक्षा खडसे आक्रमक
छेडखानी प्रकरणी सात संशयीताविरोधात गुन्हा दाखल : एकाला अटक
भुसावळ (2 मार्च 2025) : कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील यात्रोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी अल्पवयीन मुलींची छेड काढल्यानंतर या प्रकरणी दोषी आरोपींविरोधात गुन्हा दाखल होवून त्यांच्यावर तत्काळ अटकेची कारवाई करावी या मागणीसाठी मंत्री रक्षा खडसे रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गुन्हेगारांच्या टोळीवर तत्काळ कारवाईची मागणी करीत हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू, असे बजावले. प्रभारी डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी या संदर्भात दखल घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. दरम्यान, छेडखानीप्रकरणी सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे.
मोबाईल तपासल्याच्या वादातून सुरक्षा रक्षकासोबत वाद
कोथळी, ता.मुक्ताईनगर येथे यात्रोत्सव सुरू असून गावातील लोकप्रतिनिधींच्या मुलीसह तिच्या काही अल्पवयीन मैत्रिणी 28 मार्च रोजी रात्री नऊ वाजता पाळण्यांवर बसण्यासाठी गेल्यानंतर गावातील काही टवाळखोरांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी संशयीत व्हिडिओ शुटींग करीत असल्याचा संशय आल्यानंतर पोलीस शिपाई नरेंद्र बंडू चोपडे (36, निमखेडी बु.॥, ता.मुक्ताईनगर) यांनी मोबाईल तपासल्यानंतर संशयीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवत कर्तव्यात अडथळा आणला. याप्रकरणी चोपडे यांच्या फिर्यादीवरून अनिकेत भोई, पियुष मोरे, सोम माळी, अतुल पाटील, किरण काळी (सर्व रा.मुक्ताईनगर) यांच्याविरोधात शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी मंत्री खडसे आक्रमक
यात्रोत्सवात गेलेल्या अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन करीत छेडखानी केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करून अटक करण्याच्या मागणीसाठी मंत्री रक्षा खडसे रविवारी सकाळी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पीडीत मुलींसह दाखल झाल्या.
यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत लोकप्रतिनिधींच्या मुली जेथे सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्यांचे काय म्हणत संताप व्यक्त केला. हा प्रकार आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू, असे त्यांनी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना सांगितले. यावेळी यात्रोत्सवात गेलेल्या मुलींनी घडला प्रकार कथन केला तर शाळेत जाणार्या काही मुलींना दररोज रोडरोमिओ कशा पद्धत्तीने त्रास देतात याचा लेखाजोखा सांगितला.
