गुंडांना सोडण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन : माजी मंत्री एकनाथ खडसेंचा दावा
मुक्ताईनगर (2 मार्च 2025) : मुक्ताईनगरात मुलीची छेडखानी करणारे टवाळखोर नाही तर गुंड आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे पोलिसात दाखल आहेत. यात्रेत छेडखानी रोखणार्या पोलिसालाच मारहाण करीत शिविगाळ करण्याची हिंमत गुन्हेगारांनी केली कारण या गुंडांना लोकप्रतिनिधींचे संरक्षण आहे, असा धक्कादायक आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केला. गुंडांना सोडण्यासाठी दोन ते तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन यायचा, असे मला पोलिसांनीच सांगितल्याचा धक्कादायक दावादेखील खडसे यांनी यावेळी केला.
खडसे म्हणाले की, हा माझ्या घरातील नव्हे तर सामाजिक प्रश्न आहे. महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत आहे, अनेकदा तक्रार करण्यासाठी मुली बदनामीपोटी धजावत नाहीत. महाराष्ट्रातील महिलांवर आता स्वतःच संरक्षण करण्याची वेळ आली आहे. गेल्या चार वर्षात गुंडगिरी वाढली असून सरकारने आता कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. योग्य वेळी अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न असेल, असेही माजी मंत्री खडसे म्हणाले.

