राजीनाम्यानंतर ट्वीटमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की…!
मुंबई (4 मार्च 2025) : सरपंच हत्या प्रकरणानंतर आरोप झालेले व पदावरून पाय उतार झालेल्या धनंजय मुंडे यांनी ट्वीट करीत राजीनामा का दिला? याची माहिती दिली आहे.
प्रकृती ठीक नसल्याने दिला राजीनामा
धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे असं त्यांनी सांगितले. त्यामुळे माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री यांच्याकडे दिल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मुंडे पदावरून मुक्त : मुख्यमंत्री
धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला असून त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं.
दमानिया स्पष्टच म्हणाल्या : प्रशासकीय बदल्यांचा अधिकार काढून घ्या
मुख्यमंत्री यांनी राजीनामा आल्यानंतर राज्यपालांकडे पाठवल्याचे सांगितले. तुम्हाला संवेदना नाहीत का, देशमुख कुटुंबाला किती यातना झाल्या त्या दिसल्या नाहीत का? विरोधी पक्ष फक्त घोषणेचा ड्रामा करतोय. तुम्हाला लोकांसाठी झटायला ठेवलंय. सामान्य माणसे चिरडली जातेय, यंत्रणा, प्रशासन राजकारण्यांसाठी काम करतायेत. कितीही राजकीय दबाव आला तरी चुकीचं काम करणार नाही अशी भूमिका प्रशासकीय अधिकार्यांनी घेतली पाहिजे. राजकारण्यांच्या हातातून प्रशासकीय बदल्यांचा अधिकार काढला सगळं नीट होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.
