भुसावळ शहरात नऊ हजार 75 किलो कचर्याचे संकलन
स्वच्छता अभियानातून 13 शासकिय कार्यालये चकाचक
भुसावळ (4 मार्च 2025) : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने भुसावळ शहरात महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ.सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 520 हून अधिक श्री सदस्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
प्रमुख रस्त्यांची स्वच्छता
भुसावळ शहरात सकाळी 8:30 ते 11:30 दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भुसावळ येथील प्रमुख 13 शासकीय कार्यालयात तसेच शहरी भागातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. प्रशासनाच्या सहकार्याने संकलीत कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता मोहिमेत नगरपरिषदेचे अधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग नोंदवला. या अभियानातून 500 किलो ओला कचरा तसेच आठ हजार 575 किलो सुका असा एकूण नऊ हजार 75 किलो कचरा संकलीत करण्यात आला. या अभियानात सहा ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. या मोहिमेत श्री सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध उपक्रम राबवल्याने या उपक्रमाचे कौतूक झाले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती आणि सामाजिक बांधीलकी वाढविण्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

