लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेच नाही : आदिती तटकरे
न्यूज नेटवर्क । मुंबई (5 मार्च 2025) : राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनापर्यंत जमा होणार असताना त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. अशातच मंत्री आदिती तटकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बजेटच्या वेळी 2100 रुपये घोषित करु, असे वक्तव्य केले नसल्याचे सांगितले आहे. आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत. पाच वर्षांसाठी जाहीरनामा तयार केलेला असतो. मंत्रिमंडळ जेव्हा तसे सूचित करेल तेव्हा आमच्या खात्याकडून तसा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली.
अदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाल्या की, लाडकी बहीन योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून योजनेवर टीका सुरू आहे. ही योजना लाडक्या बहीनींची सर्वात आवडती योजना ठरली. म्हणून कुठेतरी पहिल्या महिन्यात पावणेदोन कोटी महिलांना लाभ मिळाला तर निवडणुकीनंतर दोन2 कोटी 45 लाख महिलांना लाभ मिळाला. आता दोन कोटी 52 लाख महिलांना लाभ देणार आहोत. आम्ही निवडणुकीच्या आधी वेगळी निवडणुकीनंतर वेगळी भूमिका घेत नाही.

यावर बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले की, योजना सुरू करताना राज्य शासनाने 10 जीआर काढले. तेव्हा राजकीय हेतू ठेवत ही योजना सुरू केली हे सर्वांना माहिती आहे. योजना करताना विचारपूर्वक निर्णय झाला नाही. राजकीय हेतू ठेवत निर्णय घेण्यात आला.
सतेज पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून ही योजना काढण्यात आला. बहीणींवर प्रेम म्हणून ही योजना काढण्यात आली नाही. मंत्री आज जे निकष सांगत आहेत ते पहिल्यापासून होते. त्याची जबाबदारी जिल्हाधिकार्यांची होती. ज्यांना अपात्र करताय त्यांची फसवणूक केली जात आहे.
