नशिराबादजवळ परप्रांतीय तीन मजुरांना चिरडले
पहाटेच्या सुमारास घडली घटना : ः मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल

Three migrant laborers crushed to death near Nashirabad नशिराबाद (11 मार्च 2025) : नशिराबादजवळील जळगाव खुर्द येथे साखरझोपेत असलेल्या परप्रांतीय तीन मजुरांना पहाटेच्या सुमारास अवजड वाहनाने झोपेतच चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सिकंदर नाटूसिंग राजपूत, भूपिंदर मिथीलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहाद्दूर (तिघे राहणार उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
काय घडले पहाटेच्या सुमारास
जळगाव शहरापासून जळगाव खुर्द हे या आठ किलोमीटर अंतरावरील गावला लागून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे काम तसेच पुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचेदेखील काम सुरू आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाच पुलाच्या कामाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर कामाला आहेत. काल सायंकाळी मजूरांनी काम केल्यानंतर सर्व्हिस रोडवर पट्टी टाकून झोपी गेले मात्र तिघेजण गाढ झोपेत असतांना अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीला आली.
दरम्यान हा सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद होता. याठिकाणी रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारीचे काम देखील सुरू होते मात्र या रस्त्यावरून गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहन गेले असल्याचा दाट संशय यंत्रणेला आहे. या प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
दुसरीकडे या रस्त्याचे आणि पुलाचे काम करणार्या ठेकेदाराने घेतले असून त्याचेच वाहन गेले असल्याची पोलिसांना शंका आहे. घडल्या प्रकाराची चौकशी सुरू असल्याची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, नशिराबाद एपीआय ए.सी.मनोरे आदींनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.


