राजोरा येथे व्यसनाच्या प्रतिकात्मक होळीचे दहन

यावल (11 मार्च 2025) : यावल तालुक्यातील राजोरे येथे विद्यार्थ्यांसाठी व्यसनाच्या प्रतीकात्मक होळी दहनाचा आगळा वेगळा कार्यक्रम झाला. होलिका दहन हे समाजातील कुप्रवृत्तींचे दहन असल्याचा सामाजिक संकेत आहे. या संकेताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी आणि होळीसारख्या सणाच्या माध्यमातून कुविचार, कुप्रवृत्ती आणि जीवनावर दुष्परिणाम करणारे अमली पदार्थ यांचे दहन करायचे असा संस्कार विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी हा कार्यक्रम नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे जळगाव जिल्हा संघटक डॉ.दयाघन एस.राणे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून राजोरे गावचे सरपंच पुष्पा पाटील, ग्रामपंचायत सदस्य महाजन, भुसावळ येथील समुपदेशक आरती चौधरी उपस्थित होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात जिल्हा परिषद शाळा, राजोरे आणि एल.एम.पाटील विद्यालय, राजोरे या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाने या उपक्रमात सहभाग घेतला. प्रसंगी व्यसनाची आणि अमली पदार्थांची प्रतिकात्मक होळी पेटविण्यात आली. मुख्याध्यापक जी.एस.साळुंखे यांनी होळी या सणाचे सांस्कृतिक महत्व सांगितले. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना व्यसन केल्यामुळे कर्करोगासारख्या भयानक आजार होत असल्याचे सांगितले.
समुपदेशक आरती चौधरी, राजोरे येथील सरपंच पुष्पा पाटील, मुख्याध्यापिका रंजना सोनवणे व मुख्याध्यापक जी.एस.साळुंखे यांच्या हस्ते व्यसनांच्या प्रतीकात्मक होळीचे दहन करण्यात आले. डॉ.दयाघन राणे यांनी सांगितले की, प्रत्यक्ष अमली पदार्थांची होळी केली तर ते पदार्थ जाळून त्यांचा धूर वातावरणात प्रदूषण तयार करतो. म्हणून अशा पदार्थांची होळी करण्या ऐवजी त्यांची कागदी प्रतिके जाळून ही होळी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन भुसावळ येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रो.सारंग चौधरी, राजोरे येथील सामाजिक कार्यकर्ते मयुर संजय महाजन आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हा संघटक डॉ.दयाघन एस.राणे यांनी केले.


