रावेर पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीसाठी जाणार्‍या 14 बैलांची सुटका


रावेर (11 मार्च 2025) : कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीच्या 14 बैलांची रावेर पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई रसलपूर येथे करण्यात आली असून संशयीताविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पालकडून लालमाती खिरोदा प्र.रावेरमार्गे रसलपूर मार्गाने गुप्तपणे गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या धाव घेत रसलपूर जवळील आदिवासी आश्रमशाळेजवळ दोन इसम रस्त्यावरून गोवंश घेऊन जाताना आढळल्यानंतर त्यांना हटकताच ते पसार झाले. पोलिसांनी तीन लाख 70 हजार रुपये किंमतीचे 14 बैल जातीचे गोवंश जप्त करून रावेर येथील द्वारकाधिश गोशाळेत संगोपनासाठी रवाना केले. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुसेन अब्दुल रहेमान तडवी, कादीर अब्दुल रहेमान तडवी (पाल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, हवालदार सतीष सानप, कॉन्स्टेबल संभाजी बिजागरे, राहुल परदेशी, होमगार्ड राहुल कासार यांच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.