नशिराबादनजीक परप्रांतीय तीन मजुरांना चिरडले : डंपर चालकाला अखेर अटक

नशिराबाद पोलिसांची कारवाई : बाल कामगारास कामावर ठेवणार्‍या ठेकेदाराविरोधात गुन्हा


Three migrant laborers crushed near Nashirabad : Dumper driver finally arrested जळगाव (13 मार्च 2025) : नशिराबादजवळ सर्व्हिस रस्त्याच्या कामासाठी आलेल्या अल्पवयीनासह परप्रांतीय तीन मजुरांना डंपरने चिरडल्याची संतापजनक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. अत्यंत मन विषन्न करणार्‍या या घटनेतील आरोपी निष्पन्न करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 10 तास सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर डंपर चालक निष्पन्न केला व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली तसेच पुलाच्या कामावर बालकामगार ठेवल्याप्रकरणी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. कंत्राटदार नेमका कोण ? याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी नशिराबाद पोलिसांनी नहींला पत्रव्यवहार केला आहे.

भल्या पहाटे डंपरने तिघांना चिरडले
नशिराबादजवळील जळगाव खुर्दजवळ भुसावळकडून जळगावकडे येणार्‍या उड्डाणपुलाचे, सर्व्हिस रस्त्याचे व ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. सोमवारी रात्री काम झाल्यानंतर नऊ वाजेच्या सुमारास मजूर घराकडे परतले मात्र परप्रांतीय तीन मजुरांनी पूल बांधकामाची वाहने येण्या-जाण्यासाठीच्या रस्त्यावर पथारी मांडली मात्र पहाटेच्या सुमारास गौण खनिज आणणार्‍या डंपरने झोपेतच असलेल्या तीन मजुरांना अत्यंत निर्दयीपणे चिरडले. अपघातानंतर डंपर चालक वाहनासह पसार झाला. या दुर्दैवी घटनेत शैलेंद्रसिंग नथ्थूसिंग राजपूत (30), भूपेंदर मिथीलाल राजपूत (32, दोन्ही दलेलपूर, ता.विटा, उत्तरप्रदेश) तसेच योगेशकुमार राज बहाद्दूर (14, रा.सिढपुरा, जि.कासगंज, उत्तरप्रदेश) यांचा मृत्यू ओढवला. दरम्यान, होळी, धूलिवंदन सण असल्याने असंख्य मजूर त्यांच्या मूळ गावी गेले असून सुदैवाने हे मजूर घटनास्थळी असतेतरी चित्र आणखी भयावह राहिले असते हेदेखील तितकेच खरे !

अशी उघडकीस आली घटना
मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास राम सहोदर सेन (मध्यप्रदेश) हा चालक डंपर घेवून आला मात्र रस्त्यात त्यास मजूर झोपल्याचे दिसल्यानंतर त्याने अनेकदा हॉर्न वाजवूनही मजूर उठत नसल्याने त्याने डंपर बंद करून मजुरांना उठवण्यासाठी गेल्यानंतर त्यांना मजुरांचा चेंदामेंदा झाल्याचे लक्षात येताच त्याने 112 क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. नशिराबाद पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व तिघा मयतांचे मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले.

डंपर चालकांसह सुपरवायझरने साधली चुप्पी
तीन परप्रांतीयांना अत्यंत निर्दयीपणे चिरडल्यानंतर पोलिसांनी तीन डंपर ताब्यात घेतले चालकांची तसेच कामावरील सुपर वायझरसह संबंधितांची चौकशी सुरू केली मात्र आम्ही त्यातले नाहीत हा आर्विभाव संबंधितांना आणत कुठलीही माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करीत ताब्यात घेतलेल्या डंपरच्या टायर्सवर रक्ताचे डाग व मांसाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न केला.

दहा तासांचे फुटेज तपासल्यानंतर संशयीत निष्पन्न
तीन परप्रांतीयांना चिरडणार्‍या डंपर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळापासून काही अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तब्बल दहा तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पहाटे 5.35 वाजेच्या सुमारास एक डंपर (एम.एच.19 सी.वाय.3191) गौण खनिजाची वाहतूक करताना व पुलाच्या दिशेने जाताना दिसल्यानंतर पोलिसांनी खातरजमा होताच डंपर ताब्यात घेतला व त्यावरील चालकाला बोलते केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक ए.सी.मनोरे, हवालदार उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, जावेद शहा, राहुल वानखेडे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस येण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

ठेकेदारासह चालकाविरोधात गुन्हा
तीन परप्रांतीयांना चिरडल्याप्रकरणी नशिराबादचे हवालदार अतुल लक्ष्मण महाजन यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक प्रकाश कुमार पटेल (24, उफरौली, पोस्ट कोदवरा, ता.शिहावर, जि.सिधी) व कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक ए.सी.मनोरे करीत आहेत.

 


कॉपी करू नका.