भुसावळात पावनखिंड दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद : 538 स्पर्धकांचा सहभाग


भुसावळ (17 मार्च 2025) : छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती सोमवार, 17 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी होणार असल्याने पूर्वसंध्येला शहरात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता नाहाटा महाविद्यालयापासून दुचाकी रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर भगवे ध्वज व मोठ्या पताका लावण्यात आल्याने संपूर्ण शहर भगवामय झाले आहे तर छत्रपतींच्या पुतळ्याभोवतीही आकर्षक रोशनाई करण्यात आली आहे.

दौडमध्ये 538 भुसावळकरांचा सहभाग
दरम्यान, शिवजयंतीच्या पूर्व संध्येला शहरात रविवारी पावनखिंड दौडचे आयोजन करण्यात आले व त्यात 538 भुसावळकरांनी सहभाग नोंदवला. शिवजन्मोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी 9 वाजता नाहाटा महाविद्यालय ते छ. शिवस्मारकापर्यंत मोटारसायकल रॅली निघेल. यानंतर दुपारी 12 वाजता अन्नदान, सायंकाळी पाच ते सात दरम्यान वेशभुषा, चित्रकला, निबंध स्पर्धा होतील. तर सायंकाळी सात वाजता शहरातील सामाजिक सेवेत योगदान देणार्‍यांना शिवभुषण पुरस्काराने गौरविण्यात येईल. यासोबतच समितीकडून मिरवणूकीत येणार्‍या प्रत्येक मंडळाचा सत्कार व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.

शहरात आज विविध कार्यक्रम
सोमवारी सकाळी नऊ वाजता नाहाटा महाविद्यालय ते छत्रपती शिवस्मारकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे तर दुपारी 12 वाजता अन्नदान, सायंकाळी पाच ते सात दरम्यान वेशभूषा, चित्रकला, निबंध स्पर्धा होईल. सायंकाळी सात वाजता शहरातील सामाजिक सेवेत योगदान देणार्‍यांना शिवभूषण पुरस्काराने गौरविण्यात येईल. यासोबतच समितीकडून मिरवणूकीत येणार्‍या प्रत्येक मंडळाचा सत्कार व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.

पावन खिंड दौडला प्रतिसाद
शिव जन्मोत्सव समितीने रविवारी सकाळी ‘एक दौड महाराजांसाठी’ पावनखिंड दौडचे आयोजन केले होते. यात ऑनलाईन 288 व ऑफलाईन 200 आणि ऐनवेळी 50 अशा 538 स्पर्धक धावले. नाहाटा महाविद्यालयापासून भगवा ध्वज दाखवल्यानंतर दौड सुरू होवून रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला. अष्टभुजा देवी मंदिराजवळ उत्सव समितीचे उपाध्यक्ष नितीन धांडे यांनी शीतल जलसेवा दिली.

यांची होती उपस्थिती
समारोपावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, क्रीडा भारतीचे जिल्हा अध्यक्ष डॉ.तुषार पाटील, रनर डॉ.नीलिमा नेहेते यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेतील पुरुष प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच महिला प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच जेष्ठ नागरीक, लहान मुले, मुली यांना उत्तेजनार्थ रोख पारितोषिक, शिल्ड, प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांचे हस्ते देण्यात आले. दौड यशस्वीतेसाठी समिती अध्यक्ष निर्मल कोठारी, उपाध्यक्ष नितीन धांडे, समितीचे सर्व पदाधिकारी इतर सर्व सामाजिक संस्था, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अंतर्नाद प्रतिष्ठान व क्रीडा भारतीचे सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.