मांगलवाडीत खंडोबा यात्रेनिमित्त बारागाड्या उत्साहात
सिंगनूर, ता.रावेर (18 मार्च 2025) : येथून जवळच असलेल्या मांगलवाडी येथे रविवारी खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्यात आल्या. या उत्सवात मांगलवाडी, हतनूर, मेहूण, सिंंगनूर, तांदलवाडी, बलवाडी, दसनूर, लुमखेडा, उदळी, सुनोदा परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
परंपरेनुसार ओढल्या बारागाड्या
यात्रेच्या दिवशी सकाळी खंडोबा मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परंपरेनुसार बारागाड्या ओढण्यात आल्या. भगत जगन्नाथ तायडे हे गेल्या 22 वर्षांपासून बारागाड्या ओढत आहेत. त्यांना सोपान तायडे, दिलीप तायडे, रमेश तायडे, रवींद्र तायडे, मुरलीधर तायडे आदींनी सहकार्य केले. यात्रेत पाळणे, खेळणी, विविध खाद्यपदार्थ विक्रीचे दुकाने थाटण्यात आली. लोकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले.

निंभोरा पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यशस्वीतेसाठी सरपंच कमल बोरसे, उपसरपंच रंजना तायडे, पोलीस पाटील दीपक तायडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.






