यावल शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी
शहरातुन काढलेली मिरवणूक ठरली लक्षवेधी
यावल (19 मार्च 2025) : शहरात सोमवार, 17 मार्च रोजी तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांकडून साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील सातोद रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर सजीव देखाव्यांसह शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीने नागरीकांचे लक्ष वेधले.
यांची होती उपस्थिती
शहरातील सातोद रस्त्यावरील पेठेच्या श्रीराम मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवपूजन कार्यक्रम घेण्यात आला. निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, काँग्रेस एनएसयुआयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, शिवसेना शिंदे गटाचे नितीन सोनार, आश्रय फाऊंडेशनचे डॉ.कुंदन फेगडेसह मान्यवरांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शिवजंयती निमित्ताने तेथून पारंपारिक वाद्य वृंदाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील सातोद रोडवरून बुरूज चौक मार्गेे, मेन रोेडाने ही मिरवणूक मार्गस्त झाली. मोठ्या संख्येत यात शिवसैनिकांसह शिवप्रेमी सहभागी झाले होते.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
मिरवणुकीच्या यशस्वीतेकरीता उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील कुंभार, उपाध्यक्ष हुसेन जहांगीर तडवी, खजिनदार प्रवीण लोणारी, सचिव सुनील जोशी, सदस्य अजहर खाटीक, योगेश राजपूत, जगदीश कवडीवाले, पप्पू जोशी, संतोष खर्चे सह आदींनी परिश्रम घेतले. या मिरवणुकीत सजीव देखाव्यांनी नागरीकांचे लक्ष वेधले. मिरवणुकीकरीता पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
