बुद्ध गयातील महाबोधी महाविहार ताब्यात मिळण्यासाठी भुसावळात ‘जनआक्रोश मोर्चा’
भुसावळात मोर्चाने वेधले लक्ष ः प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन
भुसावळ (19 मार्च 2025) : बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहारावरील महंतांचा अवैध कब्जा काढून महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी शहरात समस्त बौद्ध समाजातर्फे मंगळवार, 18 रोजी सकाळी 10.30 वाजता जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मंगळवारी सकाळी न जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा आल्यानंतर प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना पुज्य भदंत सुमनतिस्स स्थवीर (भुसावळ), पुज्य भदंत बोधी धम्मानंद थेरो (अंजाळे), पुज्य भिक्खुणी उप्पलवण्णा थेरो (भुसावळ), भदंत संघरत्न महाथेरो (जळगाव), धम्मचारी सत्यवज्र त्रिरत्न बौद्ध महासंघ (भुसावळ) यांच्याहस्ते निवेदन देण्यात आले.

श्रद्धास्थानावर कब्जा
बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी 12 फेब्रुवारी 2025 पासून भिक्खू संघाने उपोषण छेडले आहे. महाबोधी महाविहार हे केवळ भारतातील बौद्धांचेच नव्हे तर जगभरातील बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थान आहे. जागतिक बौद्धांचे श्रद्धा स्थान असलेल्या महाविहारावर ब्राम्हणांचा कब्जा आहे. बुद्धगया महाविहार संबंधित संविधानानुसार अनुच्छेद 25 आणि 26 चे पूर्ण उल्लंघन होत आहे त्यामुळे 1949 चा कायदा रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली.
हजारो नागरिक उतरले रस्त्यावर
बिहारातील महाबोधी विहार ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आंबेडकर अनुयायी समाजातील लहान बालके, वयोवृद्ध मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते. महाबोधी महाविहार हे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देत आंबेडकर अनुयायांनी शहर दणाणून सोडले. प्रत्येक भीम सैनिकांनी पांढरे वस्त्र व महिलांनी पांढरी साडी परिधान केली. प्रत्येक अनुयायांच्या हाती पंचशील ध्वज होता. मोर्चाच्या सुरुवातीला बुद्धं शरणं गच्छामि अशी ध्वनी फीत वाजत होती. या जन आक्रोश मोर्चा करिता भुसावळ सह तालुक्यातील खेड्यापाड्यातून लोकांनी सकाळी आठ वाजेपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गर्दी केली होती.






