गळती जोडणी : भुसावळ शहरातील अर्ध्या भागात पाणीपुरवठा ठप्प


भुसावळ (23 मार्च 2025) : उन्हाळ्याच्या सुरवातीलाच शहरात पाईप लाईन गळती थांबविण्याच्या कामासाठी तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे. यामुळे भुसावळकरांना टंचाई सहन करावी लागेल. शहरातील जलशुध्दीकरण केंद्रातून नाहाटा व गडकरी नगर या दोन्ही जलकुंभांना पाणीपुरवठा करणार्‍या 400 मिमी व्यासाच्या पाईपलाइनला लोखंडी बोगद्याजवळ पंधरवड्यापासून गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपासून या दोन्ही जलकुंभावरील पुरवठा बंद करण्यात आला.

शनिवारी सकाळपासून प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली. सोमवारी सायकांळपर्यंत काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. यामुळे शहरातील तब्बल दीड लाख लोकसंख्येच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा तीन दिवस ठप्प राहणार आहे. दुरुस्तीनंतरही रोटेशन तीन दिवस उशिराने मिळेल, अर्थात दर दहा दिवसांनी पाणीपुरवठा हेाणार्‍या भागांना आता 13 दिवसांनी पाणी मिळणार आहे. या काळात मात्र पालिकेने दक्षिण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी इतर कोणत्याही पर्यायी व्यवस्था केलेल्या नसल्याची बाबही समोर आली आहे.


पाईप लाईन रिकामी करण्यासाठी 24 तास
पाईपलाइनच्या डागडूजीसाठी शुक्रवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. 400 मीमी व्यासाच्या या पाईपलाइनमध्ये असलेले पाणी बलबलकाशी नाल्यात ठेवलेल्या व्हॉल्वमधून काढण्यात आले. यासाठी तब्बल 12 तासांचा कालावधी लागला. शनिवारी सकाळी पाईपलाइनमधील पाणी निघाल्यानंतर जेसीबीने खोदकामाला सुरवात करण्यात आली.

दोनपैकी एका गळतीचा लागला शोध
400 मिटर व्यासाच्या पाईपलाइनला बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ दोन लिकेज आहेत. शनिवारी सकाळी खोदकाम केल्यानंतर दुपारी एक गळती आढळली आहे. तर दुसरी गळती खालील बाजूच्या पाईपला असल्याची शक्यता असल्याने जोडणीचे काम रविवारी सुरु होऊ शकेल. जोडणी पूर्ण करुन चाचणी घेतल्यानंतर सोमवारी दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरु होईल.

जोडणीचे काम रात्रंदिवस सुरु राहणार
आगामी आठवड्यात हिंदू धर्मियांचा गुढी पाडवा तर मुस्लिम बांधवांची रमजान ईद आहे. या सणासुदीच्या काळात टंचाई नसावी,यासाठी पाईपलाइन जोडणीचे काम युध्दपातळीवर रात्रंदिवस पुर्ण केले जात आहे. सध्या दोन लिकेजच्या व्यतिरिक्त इतर कामे वाढल्यास या दुरुस्तीला विलंब होऊ शकेल. काम वाढले नाही तर वेळेत सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल.

मुख्याधिकारी फातलेंनी केली पाहणी
दरम्यान बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर सुरु केलेल्या दुरुस्तीच्या कामाला मुख्याधिकारी राजेंद्र फातले, पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी व सतीश देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली. मुख्याधिकारी फातले यांनी हे काम कमी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !