भुसावळातील मरीमाता यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेर्‍यांची नजर

रस्त्यावर बॅरिकेडिंग ः उत्सव पाहण्यासाठी मोठे एलईडी स्क्रीन लावणार


भुसावळ (27 मार्च 2025)  भुसावळ शहरातील जुने सतारे भागात असलेल्या जगतजननी मरीमाता मंदिरात यात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुढीपाडव्याला मरिमाता मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्यात येणार आहे. बारागाड्या उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोन कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. यासोबतच यात्रोत्सवात ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. दरम्यान, पालिकेने यात्रेच्या पार्श्वभूमीवर जळगाव रोडच्या पथदिव्यांची दुरुस्ती पूर्ण केली आहे.

यात्रोत्सवात बारागाड्यांचे आकर्षण
शहरातील जुने सतारे भागातील जगत-जननी मरीमातेचा यात्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सायंकाळी ओढल्या जाणार्‍या बारागाड्या भाविकांचे आकर्षण असून या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मरीमातेच्या यात्रोत्सवाची भुसावळकरांना उत्सुकता असते. यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकार्‍यांनी यात्रोत्सवाची तयारी केली आहे.


गर्दी रोखण्यासाठी नियोजन
यात्रोत्सवात टारगट मुलांचा त्रास रोखण्यासाठी शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यासोबतच यात्रोत्सवात सतारे भागातील स्वयंसेवक देखील सेवा देतील. तीन वर्षांपूर्वी बारागाड्या ओढताना दुर्घटना होऊन एकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जळगाव रोडवर बारागाड्या ओढताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग असेल. त्याच्या आतील बाजूने केवळ स्वयंसेवकांना प्रवेश असेल. त्यासाठी काही स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेमून दिलेल्या स्वयंसेवकांशिवाय बारागाड्यांवर कुणालाही बसता येणार नाही.

एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार
जळगाव रोडवर बॅरीकेट्स, ड्रोन कॅमेरे, परिसरात प्रखर उजेड देणारे हॅलोजन लाईट बसवण्यात येणार आहे. मंदिरावर आकर्षक सजावट तसेच यात्रोत्सवात मंदिराच्या परिसरात थाटल्या जाणार्‍या दुकानांना जागा देण्यात येणार आहे. यंदाच्या यात्रोत्सवात पंचमुखी हनुमान मंदिर ते शर्मा चक्की पर्यंतच्या मार्गावर बॅरिकेडिंग करणे, रुग्णवाहिका तैनात ठेवणे आदींसह परिसरात प्रखर प्रकाश देणारे दिवे बसविणे, यात्रोत्सवातील टवाळखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे, एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार आहे.

मंदिरावर आकर्षक रोशनाई
यात्रोत्सव निर्विघ्नपणे पार पाडला जावा, यासाठी सर्व सातारे ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत. मरीमाता मंदिराला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून यात्रोत्सवाला गुढीपाडव्याच्या अगोदर मध्यरात्रीपासून पूजेने सुरूवात होते. भगतांच्या हस्ते चंद्रमोळी महादेवाचा अभिषेक केला जातो. तसेच देवीची महाआरती केली जाते. यानंतर गुढीपाडव्याला पहाटेपासून महापूजा सुरू होईल. यानंतर भाविकांना मंदिरात दर्शन घेता येईल. या उत्सवासाठी मंदिर परिसराची सजावट करून आकर्षक विद्युत रोषणाई केली जात आहे.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !