‘खाकी’चा वाढवला गौरव : भुसावळ पोलीस विभागातील टॉपर कर्मचार्यांचा पुरस्काराने सन्मान
भुसावळ (27 मार्च 2025) : कर्तव्याप्रती सचोटी व प्रामाणिकपणा जोपासत पोलीस दलाचे नाव अधिकाधिक उंचावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार्या भुसावळ विभागातील पाच पोलीस कर्मचार्यांचा ‘एम्प्लॉई ऑफ द मंथ’पुरस्काराने भुसावळ विभागाचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी नुकताच सन्मान केला. भुसावळ पोलीस प्रशासनातर्फे दर महिन्याला येथील बाजारपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, शहर वाहतूक पोलीस ठाणे आणि नशिराबाद पोलीस ठाण्यातील प्रत्येक एका कर्मचार्यांना गौरवण्यात येते.
पुरस्काराने कर्मचार्यांमध्ये वाढले बळ
दर महिन्याला पोलीस कर्मचार्यांना क्राईम मिटींगमध्ये गौरवण्यात येते. भुसावळ डीवायएसपी कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये आयोजित केलेल्या क्राईम मिटींगमध्ये कर्मचार्यांच्या कामाची माहिती अधिकारी व अन्य कर्मचार्यांना देण्यात येऊन डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी कर्मचार्यांना प्रमाणपत्र व बुके देवून सन्मान केला तर गौरवप्राप्त कर्मचार्यांना प्रत्येकी एक हजारांचा रिवॉर्ड मिळण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला.

या शिलेदारांचा सन्मान
भुसावळ शहर ठाण्याचे कॉन्स्टेबल मेहुल मनोजकुमार शहा यांनी केसेस सिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली तसेच दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. भुसावळ बाजारपेठचे नाईक विनोद नारायण डोळे यांनी अॅम्बीश प्रणालीत अटकेतील 133 पैकी 124 आरोपींची तर 2025 मध्ये 19 मध्ये 18 आरोपींची नोंद केली. भुसावळ तालुक्याचे ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक संजय वासुदेव कंखरे यांनी तपासावरील गुन्ह्यांची निर्गती केली तसेच मुलींसंदर्भातील दोन गुन्हे उघड केले. नशिराबादचे कॉन्स्टेबल सागर श्रावण भिडे यांनी समन्स व वॉरंटची अंमलबजावणी करीत रेकॉर्ड अद्यावत केले तसेच शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार सलीम नबी शेख यांनी एमव्ही अॅक्टच्या सहा केसेस तर लोकअदालतीच्या अनुषंगाने बीएनएस 285 प्रमाणे 35 केसेस केल्या.
कायद्याच्या परीक्षेत अव्वल आलेल्यांचा गौरव
कायद्याचे ज्ञान अद्यावत होण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत अव्वल आलेल्या भुसावळ तालुक्याचे हवालदार संजय तायडे, भुसावळ तालुक्याच्या महिला हवालदार लीना लोखंडे, भुसावळ तालुक्याचे हवालदार कैलास बाविस्कर, भुसावळ बाजारपेठचे कॉन्स्टेबल हर्षल महाजन, बाजारपेठचे कॉन्स्टेबल सागर वंजारी, बाजारपेठ हवालदार अतुल पवार यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, शहरचे निरीक्षक उध्दव डमाळे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड, नशिराबादचे सहायक निरीक्षक आसाराम मनोरे, सहायक निरीक्षक राहुल भंडारे तसेच व 60 अंमलदार उपस्थित होते.






