सावखेडासीम गावाला पेसा क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी ठिय्या आंदोलन


यावल (27 मार्च 2025) : यावल तालुक्यातील सावखेडासीम ग्रामस्थांच्या लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या 67 टक्के असल्यावर सुद्धा गावाला पेसा क्षेत्राचा दर्जा मिळत नसल्याने सोमवारी गावातील शेकडो आदिवासी सांज बांधवांनी यावल येथील जिल्हास्तरीय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पेसा दर्जा मिळण्याकरीता प्रशासकीय पातळीवर आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे लेखी आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पेसा क्षेत्राचा मिळावा दर्जा
सावखेडासीम, ता.यावल येथील आदिवासी बांधवांनी सोमवारी शेकडोच्या संख्येने यावल शहरातून विराट मोर्चा काढून मंगळवारी सकाळी 11 वाजता येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय गाठले. यावल पंचायत समितीपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर भव्य विराट मोर्चा निघाल्यानंतर प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.





आठ वर्षानंतरही मिळाला नाही दर्जा
याप्रसंगी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सावखेडासीम गावाची सन 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या पाच हजार 643 एवढी असून त्यापैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या तीन हजार 788 इतकी आहे. एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या 67.12, टक्के आहे. 2014 यावर्षी महाराष्ट्र शासनाने पेसा कायदा अंतर्गत कायदा लागू करणे संदर्भात नियम/राजपत्र प्रकाशीत केलेले असताना सुद्धा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथून 2014 ते 2022 या आठ वर्षाच्या कालावधीत यासंबंधी राज नियम ग्रामपंचायत यांना कोणतेही पत्रव्यवहार केलेला नाही. या काळात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी स्वतः सावखेडासीम गावाचा या आठ वर्षाच्या काळात ( अनुसूचित क्षेत्र/पेसा क्षेत्र ) चा दर्जा दिला नाही. यामुळे गावातील विकास व तरुणांना नोकरीपासून वंचित रहावे लागले. गावाला पेसाक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून सावखेडासीम उपसरपंच मुबारक तडवी यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अकबर हबीब तडवी,साकीर मुबारक तडवी, शाहीद जहांगीर तडवी, तडवी, सलीम इस्माईल तडवी, मुस्तफा रमजान तडवी आदींची उपस्थिती होती.

लेखी आश्वासन
आंदोलकांना प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत आजवर सावखेडासीम गावाच्या पेसा दर्जा करीता केलेल्या कार्यवाहिची माहिती दिली तसेच यापुढे देखील गावाला पेसा क्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून प्रशासकिय पातळीवर कार्यालयाकडून पाठपुरावा केला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !