अवैध वाळू वाहतुकीने घेतला अल्पवयीनाचा बळी


पारोळा (27 मार्च 2025) : जिल्ह्यात अवैधरित्या वाळूचा उपसा थांबवण्यास प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. शिरसोदे (ता. पारोळा) येथील बोरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असताना (एम.एच. 19 सी.वाय.1236) क्रमांकाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली मागे घेत असताना 15 वर्षीय देवा उर्फ गौतम गोकुळ भील याला जोरदार धडक बसली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. चालक अजय देवमन भिल याने जखमीच्या भावाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर बहादरपूर सरकारी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक अजय भिल आणि ट्रॅक्टर मालक समाधान शंकर पाटील (रा. शिरसोदे, ता. पारोळा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चालकास पोलिसांनी अटक केली तर वाहन जप्त करण्यात आले.





या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असून महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी नागरिकांची तीव्र नाराजी आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून ही अवैध वाळू वाहतूक थांबवावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !