वरणगावातील वीर जवान अनंतात विलीन…!
अरुणाचल प्रदेशात वीर मरण आलेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भुसावळ (28 मार्च 2028) भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील रहिवासी व सैन्य दलातील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांना अरुणाचल प्रदेशात ड्युटीवर असतांना सोमवार, 24 मार्च रोजी वीर मरण आले होते. सैन्य दलाच्या विमानाने व वाहनाने त्यांचा मृतदेह वरणगाव शहरात गुरुवार, 27 रोजी सकाळी आणल्यानंतर शोकाकुल वातावरणात वरणगाव उप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीर जवान अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या.
वीर जवान अमर रहेचा जयघोष
वीर जवानाचे पार्थिव अरुणाचल प्रदेशातून दिल्ली व दिल्लीहून संभाजी नगर व तेथून सेनेच्या वाहनाने वरणगाव येथे आणण्यात आला. सम्राट नगरातील जवानाच्या घरी पार्थिक आणल्यानंतर कुटूंबाने मोठा आक्रोश केला. यावेळी घरापासून भव्य अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अर्जुन बावस्कर अमर रहेच्या घोषणांनी शहर निणादले तर देशभक्तीपर गीतांनी परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. रेल्वे स्टेशन मार्गाने तिरंगा चौकात पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी वीर जवानाला श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले. वरणगाव महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनसीसी पथकाने तिरंगा हाती घेतला.

वीर सुपूत्राला अखेरचा निरोप
शासकीय सन्मानाने वीर जवानाला श्रद्धांजली वाहण्यात आली. लष्कर, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.गावातील नागरिक, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. वरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून अंतिम मानवंदना दिली. वीर जवानाच्या कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला. ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
यांची होती उपस्थिती
पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, मुख्याधिकारी सचिन राऊत, आर्मी अधिकारी अमित, जिल्हा सैनिक बोर्ड अधिकारी, 10 महार बटालियन ग्रुप, यशसिध्दी ग्रुप, माजी सैनिक, सुटीवर आलेले सैनिक यांनीही मानवंदना दिली. यावेळी वरणगावचे प्रभारी पोलीस अधिकारी जनार्दन खंडेराव, सुबेदार जर्नल सिंग, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक वंदना चव्हाण, विविध कार्यकारी सोसायटीचे विनोद झोपे, कृषी, उत्पन्न बाजार समितीचे किशोर भंगाळे, नागो पाटील, भुसावळ तालुका शेतकी संघाचे प्रशांत निकम, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, समाधान चौधरी, यांनी वीर जवानाला आदरांजली वाहिली.
वरणगावकरांनी दुकाने ठेवली बंद
वीर जवानाच्या निधनाने वरणगावावर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी दिवसभर श्रद्धांजली अर्पण केली. अनेक सामाजिक संघटनांनी श्रद्धांजली सभा आयोजित केली तर शहरातील व्यापार्यांनी दिवसभर आपापली दुकाने बंद ठेवली.
पार्थिवाचे दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन जखमी
वीर जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन वरणगावात उपस्थित होते. पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रकमध्ये चढताना त्यांच्या डोक्याला वाहनाचा रॉड लागल्याने रक्तस्त्राव झाला मात्र अशाही परिस्थितीत चक्कर येत असतानाही त्यांनी वीर जवान अर्जुन बाविस्करच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करीत अभिवादन केले. रक्तस्त्राव थांबत नसल्याने माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह स्थानिक पदाधिकार्यांनी त्यांना खाजगी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बाविस्कर कुटूंबाची भेट घेत माझ्यासह राज्य सरकार बाविस्कर परिवाराच्या पाठीशी असल्याचे सांगत वाहनाद्वारे नाशिक बैठकीसाठी रवाना झाले.